Effect of Rising Temperatures on crops : वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम, पावसाप्रमाणं उष्णतेचा अंदाज वर्तवण्याची शेतकऱ्यांची मागणी
तापमानात मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. याचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे.
Effect of Rising Temperatures on crops : सध्या देशात तापमानात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस तापामानाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 40 ते 45 अंशाच्या आसपास तापमानाचा पारा आहे. एका बाजुला उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना या वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानवाढीचा पिकांवर परिणाम झाल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे भारतीय हवामान विभागाकडून पावसाचे वेळोवेळी अंदाज वर्तवले जातात, तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत देखील द्यायला हवेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाढत्या तापमानाचा पिकांवर नेमका कसा परिणाम होतो. शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्या येत आहेत. यासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. यावर्षी वाढलेल्या उष्णतेचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. त्यामुळे पावसासारखा उष्णतेचा अंदाज देखील शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. कोणत्याही पिकाची वाणाची 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात गुणवत्तेच्या संदर्भात ट्रायल झालेली नाही. त्यामुळे आता हवामान बदलात टिकाव धरु शकणारे वाण विकसीत होणे गरजेचे आहे. या दृष्टीने कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत असे मत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी काशिनाथ पागिरे यांनी व्यक्त केले आहे.
तापमानावाढीचा विविध फळबागा, तसेच भाजीपाला पिके यांनाही मोठा फटका बसतो. वाढत्या तापमानामुळे पिकातील फुलांची गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा वाढत्या तापमानात पिकाला कितीही पाणी दिले तरी ते पिक तग धरत नाही. त्यामुळे अशा स्थितीत कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे असे काशिनाथ पागिरे यांनी सांगितले. कृषी विद्यापीठांनी 42 ते 45 अंश तापमानात टिकणाऱ्या पिकांचे संशोधन करावे. तसे वाण विकसीत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भारतीय हवामान विभाग ज्या प्रमाणे पावसाचे अंदाज देते तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत सुद्धा द्यायला हवेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे नियोजन, दक्षता घेतला येईल असे पागिरे यांनी सांगितले.
उत्पादनात घट येण्याची शक्यता
तापमाना वाढीचा पिकांवर मोठा परिणाम होत आहे. 80 टक्के पिकांमध्ये पुलगळतीची समस्या झाल्याचे मत पुणे जिल्ह्यातील मंचर मधील शेतकरी शिवाजी आवटे यांनी सांगितले. या वाढत्या तापमानामुळे उत्पादनाता मोठी घट येण्याची शक्यता आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही. विस्तृत पाऊस अनेक ठिकाणी राज्यात झाला नाही. म्हणून सध्या तापमानात वाढ होत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत असल्याचे आवटे यांनी सांगितले. याचा फटका जून आणि जुलैमध्ये कळे असेही त्यांनी सांगितले.
क्रॉप कव्हरचा वापर करावा लागणार
वाढत्या तापमानापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हरचा उपयोग करावा लागणार आहे. साधारण एक महिन्यापर्यंत हे कव्हर पिकावर टाकता येते. पहिल्या टप्प्यात 15 मार्ट ते 15 एप्रिलपर्यंत टाकले तर शेतकऱ्यांच्या पिकांना धोका कमी आहे. यामुळे एक एक फवारण्यादेखील तकमी होती असे आवटे म्हणाले. ज्याप्रमाणे शेड नेट असते त्याचप्रमाणे क्रॉप कव्हर असते असे आवटे यांनी सांगितले. शेडनेटला पर्याय म्हणून क्रॉप कव्हरचा पुढच्या काळात वापर होऊ शकतो असे आवटेंनी सांगितले.
मका पिकावर परिणाम
मका पिकावर देखील तापमानवाढीचा परिणाम दिसून आला आहे. स्वीट कॉर्नला ड्रिहायड्रेशन होत आहे. म्हणजे कणसातील दाणे तापमान आणि पाणी कमतरता यामुळे दबले जातात असे मत पुणे जिल्ह्यातील शिरुरचे शेतकरी योगेश सांडभोर यांनी सांगितले. दाण्यांची वाढ न झाल्यामुळे तो माल व्यापारी कंपनी घेऊन जातं नसल्याचे योगेश यांनी सांगितले. पावसाळ्यात पर्यटन व्यवसायमुळे स्वीट कॉर्नला चांगली मागणी असती. ठरावीक पिके सोडली 38 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमान हे मका किंवा अन्य कोणत्याही पिक वाढीसाठी योग्य नाही. तापमान वाढीमुळे लष्करी अळीचा प्रार्दुभाव, कमी उत्पादन यामुळे मका पिक परवडणारे नाही असेही ते म्हणाले. आता देखील काही ठिकाणी मका पिकाची लागवड सुरु आहे. पण वाढत्या तापमानाचा पिकाच्या उगवन क्षमतेवर परिणाम झाला असल्याची माहिती योगेश यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काही भागांमध्ये तापमान वाढीमुळे मक्याच्या कणसाला पूर्णपणे दाणे भरले नाहीत. कणसाचा खालील भाग रिकामा राहील असल्याचे शेतकरी शिवाजी पिंपरे यांनी सांगितले.
केळी पिकावरही परिणाम
वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागांना फटका बसताना दिसत आहे. जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव शेत शिवारातील केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतू हा केळी बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. तसेच विक्रीसाठी तयार असलेल्या फळांना काळे डाग पडत आहेत.