Ranbhaji In Palghar : पालघरमध्ये रानभाज्यांची आवक वाढली, मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले
Wild Vegetables In Palghar : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी फुलले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
Wild Vegetables In Palghar : पालघरमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी (Wild Vegetables) फुलले आहेत. जिल्ह्यात (Palghar) मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. आदिवासी समाजातील नागरिक जंगलातून रानभाज्या गोळा करुन रस्त्यावर ठिकठिकाणी विक्री करतात. यामध्ये कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर आदींचा समावेश आहे. लोत, कंटोली, शिराळा, काकडी, तेरा, शेवळी, शिण, पेंढरु अशा शंभरपेक्षाही जास्त भाज्या पालघरमधील जंगलांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या जंगलात मिळणाऱ्या कंटोली या भाजीला चांगला भाव मिळत आहे.
कोणत्याही प्रकारची शेती किंवा बियाणे न पेरता पावसाळ्यात पाऊस पडल्यावर निसर्गतःच उगवल्या जाणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या (Ranbhaji). या रानभाज्या जंगलात, शेत जमिनीच्या कडेला, माळावर, बांधाच्या बाजूला उगवतात. अशा रानभाज्या आरोग्याला पोषक असतात. त्यामुळे फ्लॉवर, कोबी, बटाटा, मेथी, भेंडी या भाज्यांना कंटाळलेल्यांसाठी केवळ पावसाळ्यातच येणाऱ्या रानभाज्या म्हणजे खूशखबर असते. त्यामुळे खास पावसाळ्यात रानभाज्या खाणं हा अनेकांसाठी वेगळा अनुभव असतो.
पौष्टिक रानभाज्यांना मोठी मागणी
बाजारात या रानभाज्यांची किंमत इतर पालेभाज्यांपेक्षा जास्त असली तरी शरीरासाठी या भाज्या पौष्टिक असल्याने मोठी मागणी या रानभाज्यांना आहे. या भाज्यांमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नसल्याने ग्राहकांचा कल या भाज्यांकडे जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी वाडा मार्गावर तसेच विक्रमगड जव्हार मार्गावर मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांकडून या रानभाज्या विक्री केली जात आहे. शिवाय इथे येणारे पर्यटक या रानभाज्यांना विशेष महत्त्व देत आहेत. या भाज्यांचं दुसरं महत्त्व म्हणजे दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांना या रानभाज्यांमुळे पावसाळ्यात 2 ते 3 महिने रोजगार मिळतो .
आदिवासी कुटुंबांना दोन-तीन महिने रोजगार
रानभाज्या या फक्त पावसाळ्यात मिळतात. शिवाय कोणतेही खत, केमिकल फवारणी शिवाय नैसर्गिकरित्या उगवलेल्या या भाज्यांतून मिळणारे पौष्टिक तत्त्व अधिक आहे. पावसाळ्यात अनेक घरांत या भाज्या शिजवल्या जातात. पावसाळ्यात अवघे दोन ते तीन महिने जंगलात मिळणाऱ्या या रानभाज्यांमुळे नागरिकांना भाज्यांची चव तर मिळतेच शिवाय इथल्या आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांना रोजगारही उपलब्ध होतो.
हेही पाहा
Healthy Vegetables : रानभाजीचं आहारातील महत्त्व, आरोग्यवर्धक रानभाज्यांची चव तुम्ही चाखलीत का?