Katraj Milk Price Hike : कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ, उद्यापासून नवे दर लागू
Katraj Milk Price Hike : कात्रजचं दूध दोन रुपयांनी महागलं आहे. नवीन दरवाढ उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
Katraj Milk Price Hike : कात्रजचं दूध (Katraj Milk) दोन रुपयांनी महागलं आहे. कात्रज दूध संघाकडून गाय (Cow Milk) आणि म्हशीच्या दूध (Buffalo Milk ) दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दरवाढ उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर म्हशीच्या दूध विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दरवाढीचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढू लागली आहे. अधिक दर देणार्या डेअर्यांकडे संकलन वाढल्याने कात्रज दूधसंघाचे संकलन घटू लागले आहे. त्यामुळे गायीच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय कात्रज संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित आणि मलई दुधाचे दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.
गायीचं दूध प्रतिलिटर 54 रुपयांवरुन 56 रुपयांवर
कात्रज दूध संघाकडून गायीचं फॅट आणि एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 35 रुपये होता. आता हा दर वाढवून 37 रुपये करण्यात आला आहे. परिणामी गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर 54 रुपयांवरुन 56 रुपये करण्यात आला आहे. एकीकडे शेतकर्यांना वाजवी दर देताना कात्रज दूधसंघाकडून ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे.
म्हशीच्या विक्री दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री
दुसरीकडे म्हशीच्या दुधाच खरेदी दर वाढवलेला नाही. परंतु विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार म्हशीच्या दुधाचा प्रतिलिटर दर 70 रुपयांवरुन 72 रुपये करण्यात आला आहे. विक्रीदरात वाढ करुन कात्रज दूध संघाने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावायचं काम केलं आहे.
दूध दरवाढ का?
कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन मागील पंधरा दिवसांपूर्वी सुमारे 2 लाख 15 हजार लिटरइतके होत होते. परंतु यात घट होऊन ते सध्या 1 लाख 92 हजार लिटर झालं आहे. त्यातच दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढू लागली आहे. अधिक दर देणार्या डेअर्यांकडे संकलन वाढल्याने कात्रज दूधसंघाचे संकलन घटू लागले आहे, त्यामुळे गायीच्या खरेदी-विक्री दरात आणि म्हशीच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला, असं कात्रज दूध संघाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा