Paddy Procurement : देशात तांदळाची विक्रमी खरेदी, हरियाणासह तेलंगणा यूपीमध्ये खरेदीत मोठी वाढ, वाचा कोणत्या राज्यात काय स्थिती?
Paddy Procurement : सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
Paddy Procurement : देशात आत्तापर्यंत तांदळाची विक्रमी खरेदी (Paddy Procurement) झाली आहे. आणखी सरकारकडून तांदळाची खरेदी सुरुच आहे. देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत सरकारनं 306 लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 280.51 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली आहे.
48 ते 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. तांदळाची वाहतूक करणारी वाहने विविध राज्यातील खरेदी केंद्र आणि मंडईसमोर उभी आहेत. देशातील बंपर धान खरेदीमुळे केंद्र सरकार समाधानी आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तांदळाचे पैसे 48 तासात तर 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहेत. केंद्र सरकार प्रत्येक राज्याची आकडेवारी घेऊन धान खरेदीचा तपशील गोळा करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या खरेदी वाढली आहे. सध्या ज्या पद्धतीने तांदळाची खरेदी सुरू आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात त्यात आणखी झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यात तांदळाची किती खरेदी
पंजाबमध्ये खरेदीत घट तर हरियाणामध्ये वाढ
पंजाबमध्ये तांदळाच्या खरेदीत घट झाली. कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदूळ खरेदीत 2.76 टक्क्यांची घट झाली आहे. आत्तापर्यंत पंजाबमध्ये 181.62 लाख टन तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 186.79 लाख टन खरेदी झाली होती. तर शेजारच्या हरियाणा राज्यात तांदळाच्या खरेदीत 8.18 टक्क्यांची वाढ झाली आहे. हरियणात आत्तापर्यंत 58.96 लाख टन झाली आहे. सध्या हरियाणामध्ये तांदळाची खरेदी बंद करण्यात आली आहे.
तेलंगणासह उत्तर प्रदेशमध्ये तांदळाच्या खरेदीत वाढ
तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये तांदळाच्या खरेदीत यावर्षी वाढ झाली आहे. तेलंगणामध्ये आत्तापर्यंत 16.18 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत तेलंगणात 10.94 लाख टन तांदळाची खरेदी झाली होती. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 10.28 लाख टन तांदळाची खरेदी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 9.20 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती.
छत्तीसगडमध्ये 16.88 लाख टन तांदळाची खरेदी
यावर्षी छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत 16.88 लाख टन तांदळाची खरेदी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर मागील वर्षी छत्तीसगडमध्ये तांदळाची खरेदी सुरु झाली नव्हती.
यावर्षी 775 लाख टन तांदूल खरेदीचं उद्दीष्ट
केंद्र सरकारचे 2022-23 या खरीप हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) 775.72 लाख टन तांदूळ खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. गेल्या खरीप हंगामात 759.32 लाख टन तांदळाची विक्रमी खरेदी झाली होता. यावर्षी हा विक्रम मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: