कांद्याचे दर कोसळले, दहा दिवसांत किलोमागे 14 रुपयांची घट, शेतकऱ्यांना फटका
कांद्याची आवक वाढली असली तरी त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मजूर नाहीत. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
पुणे : चाकण बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले आहेत. कांद्याच्या दरात प्रति किलो 10 ते 14 रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 5 मार्चला कांद्याचा दर हा 27 रुपये प्रति किलो इतका होता. दहा दिवसांत थेट 15 रुपयांनी दर खालावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय.
होळीच्या निमित्ताने परप्रांतीय मजूर घरी गेला आहे. त्यामुळे कांद्याची पोती लोडिंग-अनलोडिंग करायला मजुरच नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कांदा तसाच बाजार समितीत पडून राहिला आहे. परिणामी आवक वाढली आणि त्यामुळे दर खालावत गेले. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय.
कांद्याचा घसरता दर खालीलप्रमाणे,
05 मार्च 22 ते 27 रु किलो
09 मार्च 17 ते 22 रु किलो
12 मार्च 15 ते 20 रु किलो
16 मार्च 10 ते 13 रु किलो
कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी
युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे सगळीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी कांद्याचे भाव मात्र घसरले आहेत. त्यातच आयात-निर्यात धोरण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कांद्याची निर्यात ही मंदावली असल्यानं कांद्याला उठाव नाही. कांदा लागवड ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वीज, पाणी, इंध दरवाढ, खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ज्यावेळी देशातील कांद्याचे दर वाढतात, त्यावेळी सरकारकडून दर कमी करण्यासाठी हालचाली केल्या जातात. कांद्याच्या दरात घसरण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाल होत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Farmers suicides : पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा होणार
- Farmers Electricity Connection : महावितरणचा 'स्टॉप'चा आदेश जारी, कृषी पंपाच्या वीज फिरजोडणीची अंमलबजावणी सुरु