(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion News : बांगलादेश कांदा घेणार नसेल तर त्यांच्या कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करा : राजू शेट्टी
बांगलादेशने भारताकडून होणारी कांद्याची आयात थांबवली आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Onion News : भारताकडून कांद्याची (onion) आयात करणारा प्रमुख देश म्हणून बांग्लादेशकडे (Bangladesh) बघितले जाते. बांगलादेश मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी भारताकडून करतो. एकूण कांदा निर्यातीच्या 60 टक्के कांदा बांगलादेशला भारत निर्यात करत होता. परंतू, केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे लहरी धोरण, अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून बांगलादेशने भारताकडून होणारी कांद्याची आयात थांबवली आहे. या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच बांगलादेश जर आमचा कांदा घेणार नसेल कांद्याच्या त्यांच्या आयात होणाऱ्या कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करा असे शेट्टींनी म्हटलं आहे.
...तर बांग्लादेशातून आयात होणाऱ्या कापड्यांवर अडथळा निर्माण करा
भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून बांगलादेशने भारताचा कांदा आयात होणार नाही याची दक्षता घेतली आहे. इराककडून मोठ्या प्रमाणात बांगलादेशने कांदा खरेदी केला असल्याचे शेट्टी म्हणाले. आपण एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो आहे. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बंदी असल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे. तशातच दुष्काळात 13 वा महिना या म्हणीप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी बंद करुन आपलाच खरेदी केलेली कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारनं आता खडबडून झोपेतून जागं व्हावं आणि नाफेडची कांदा विक्री बंद करुन खरेदी सुरु करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा आणि बांगलादेश जर आमचा कांदा घेणार नसेल कांद्याच्या निर्यातीस अडथळा आणत असेल तर बांग्लादेशातून आयात होणाऱ्या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करावेत असेही शेट्टी म्हणाले.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही आक्रमक
दरम्यान कांद्याच्या दरावरुन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना (Maharashtra State onion Farmers Association) देखील आक्रमक झाली आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केलं आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. हा दर जर मिळाला नाहीतर 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करु असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: