(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton News : नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला पोलिस, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करावी अन्यथा....
Cotton News : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी (cotton purchase) करण्याचं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिस (Nandurbar District Police) दलानं केलं आहे.
Cotton News : नंदूरबारमध्ये (Nandurbar) कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Farmers) जिल्हा पोलिस दलानं आधार दिला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी (cotton purchase) करण्याचं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिस (Nandurbar District Police) दलानं केलं आहे. जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. या स्थितीत व्यापाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा. तसेच अतिरिक्त कोणी संशयित कापूस विक्रीसाठी आला तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ
शेतकऱ्यांच्या पांढरे सोने म्हणून कापसाकडे पाहिले जाते. मात्र, सध्या नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हातबल झाल्याचे दिसत आहे. मात्र, आता नंदुरबार जिल्हा पोलीस दल शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कापसाला मिळणारा चांगला दर आणि चोरीचा कापूस विकण्यासाठी असलेली सोपी पद्धत ही चोरट्यांसाठी वरदान ठरत होती. तर दुसरीकडे वेचणीला आलेला कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला होता. मजूर मिळत नसल्याचे चोरांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. कापूस चोरी केल्यानंतर खरेदीसाठी ग्रामीण भागात अनेक छोटे-मोठे व्यापारी असल्यानं चोरीच्या कापसाची सहज विक्री होत असे, त्यामुळं चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
... तर व्यापाऱ्यांवरही होणार कारवाई
कापूस चोरीच्या घटनेची नंदुरबार जिल्हा पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी या सर्व बाबींचा विचार करुन, दाखल झालेल्या गुन्ह्यातील काही आरोपींना अटकही केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनंतर व्यापाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा तसेच शेतकऱ्यांनी अतिरिक्त कोणी संशयित कापूस विक्रीसाठी आला तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलिसांनी केलं आहे. यासंदर्भात ग्रामीण भागात कापूस खरेदी करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी याचे पालन केले नाहीतर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.
परतीच्या पावसाचा पिकांना फटका
आधीच यावर्षी परतीच्या पावसाचा कापूस आणि सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. हाती आलेली पिकं वाया गेल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडं काही ठिकाणी या पावसाच्या कचाट्यातून देखील पिकं वाचली आहेत. मात्र अशी चोरीच्या घटना घडत असल्यानं राज्यातील शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: