Raj Thackeray & Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
Raj Thackeray & Uddhav Thackeray Press conference: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकारपरिषद, मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो, असे सांगितले. माझी एक मुलाखत झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांनाही एक आवाहन केले. त्यांनी म्हटले की, ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा, असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही ठणकावून सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाषण केले. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
पत्रकार: उद्धव सर, ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं स्थानिक पातळीवरती...
उद्धव ठाकरे: अजून बाकीच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा, कालपर्यंत युती झालेली नसेल, नाशिकमध्ये झालेली आहे. बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा तिथल्या युतीवर आज उद्या शिक्कामोर्तब होईल.
पत्रकार: सर मराठवाडामध्ये काय असणार आहे? रावसाहेब दानवे असं म्हणतात की ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शननंतर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत...
उद्धव ठाकरे: त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी विचारत नाही.
पत्रकार: उद्धवजी, उद्धवजी...
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही.
पत्रकार: उद्धवजी मराठवाडामध्ये, उद्धवजी उद्धवजी सर...
उद्धव ठाकरे: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच.
पत्रकार: पण भाजप म्हणतेय की यामुळे मुस्लिम मतांचे राजकारण...
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ‘अल्ला हू अकबर’ असं बोललेले आहेत ते, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ना...
पत्रकार: लावणार का? पुन्हा व्हिडिओ लावणार का? व्हिडिओ पुन्हा लावणार का?
उद्धव ठाकरे: ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार आहेत.
पत्रकार: उद्धवजी, ‘बटेंगे तो कटेंगे’ उत्तर भारतीयांसाठी, यावर काय म्हणाल?
उद्धव ठाकरे: काय म्हणायचं? सगळ्यावर कसं बोलायचं?
पत्रकार: उद्धवजी महाविकास आघाडीच काय? महाविकास आघाडीबाबत काय?
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं आज मुंबईचं आम्ही तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जश्या जश्या होतील तश्या तुम्हाला सांगू.
पत्रकार: साहेब मुंबईच्या युतीत राष्ट्रवादी पवार साहेब आहेत का? पक्ष सोडून गेलेल्यांना परत प्रवेश देणार का? मनसे किंवा शिवसेनेमधून जे पदाधिकारी कार्यकर्ते बाहेर गेलेत त्यांना आता युती झाल्यानंतर परत...
राज ठाकरे: येऊ तर देत पहिलं.
पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? हा एकनाथ शिंदे... उद्धवजी पवार साहेबांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का मुंबई किंवा इतर...
राज ठाकरे: उद्धववरती खूप असतं सगळं.
पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? उद्धवजी ठाकरे बंधूंची युती होत असताना महाविकास आघाडी विस्कटलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढतेय आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसतंय, कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून...
उद्धव ठाकरे: भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्याशी पण चर्चा चालू आहे. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
पत्रकार: या युतीमध्ये आणखीन कुठला एखादा पक्ष येणार आहे का?
उद्धव ठाकरे: जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्याच्यात भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, त्याच्यात काही जण भाजपात सुद्धा आहेत ज्यांना हे जे काही चाललंय ते पाहावत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात.
पत्रकार: उद्धवजी तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात का?
उद्धव ठाकरे: काँग्रेसने तर जाहीर केलं ना? मग आता आणखीन काय बोलायचं? जोडलं का तोडलं?
पत्रकार: पण उद्धवजी त्यांनी बाहेर पडण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे त्यांचे विचार...
उद्धव ठाकरे: बघा मला बाकी कोण काय म्हणतय त्याच्याशी काही कर्तव्य नाही, मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघू.
पत्रकार: तुमचं जागा वाटप... महाविकास आघाडी अबाधित आहे का अजून सुद्धा?
उद्धव ठाकरे: सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे.
पत्रकार: उद्धवजी, २०१८ साली याच जिमखान्यात एक जागा वाटप झालं होतं... युतीची घोषणा करताना ५०-५० जागा वाटपाचं समीकरण ठरलं होतं. तर आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना महानगरपालिकेत सत्ता आली, तर सत्ता वाटपाचं काही सूत्र आहे का?
उद्धव ठाकरे: त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये, तर आता आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचं घर आहे ना, दार बंद कशाला करता?
पत्रकार: जागा वाटप केव्हा जाहीर होईल?
उद्धव ठाकरे: निवडणुकीपूर्वी. अरे झालेलं आहे जागा वाटप. निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.
Shivsena & MNS Alliance: युतीच्या घोषणेला 9 नंबरचा मुहूर्त?
24 डिसेंबर युतीच्या घोषणेची तारीख
2+4+1+2=9
27 नोव्हेंबर 2005 शिवसेना सोडण्याची घोषणा
2+7=9
18 डिसेंबर 2005 शिवसेना सोडण्याची तारीख
1+8=9
9 मार्च 2006 महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची घोषणा
18 मार्च 2006 शिवतीर्थावर पहिली सभा
1+8=9
आणखी वाचा























