अवकाळीचं संकट! आंबा, भात शेतीचं नुकसान, गारांच्या पावसाने टोमॅटो सडला
Maharashtra Weather Update : राज्याच्या विविध भागात जोरदार वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मुंबई : उन्हाळा (Summer) सुरु असतानाच एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावलेली. काही ठिकाणी गारपीट तर कुठं वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. यात 257 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालं असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळं उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला आणि फळपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. यात 18 घरांचं अंशतः नुकसान झालं असून वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासनाचा हा प्राथमिक अहवाल असून यात नुकसानीचा आकडा वाढू शकतो.
सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी
यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये पहाटे तीन वाजता दरम्यान जोरदार वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही भागात गारही पडली. या अर्धातास झालेल्या अवकाळी मूसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पालेभाज्या या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तीळ या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहेत. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे.
अवकाळी पावसाने मोठं नुकसान
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पार्डी परिसरात रात्री तीन वाजताच्या सुमारास वारे आणि मुसळधार पाण्यामुळे शेतकऱ्याचे आणि गावकऱ्यांचे शेतीचे आणि घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मोठमोठी झाडे पडली असून घरावरील टिन पत्रे उडाली. तसेच विजेची तारे तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्याभरापासून चौथ्यांदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं आहे. उन्हाळ्यात पाऊस बरसल्याने मान्सून लांबणीवर जाण्याची भीती आहे.
गारांच्या पावसाने टोमॅटोचं नुकसान
वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे बागायत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा, आंबे अशा झाडाची पडझड झाली. तर नारा येथील रामकृष्ण मानमोडे यांच्या तीन एकर शेतात टमाटर, भेंडी, वांगे, कांदे असा भाजीपाला पीक लावले होते. तोडणीला आलेल्या टमाटर पिकावर गार पडली. यामुळे टमाटर फुटले आणि गळून पडले आहे. तोडणीला आलेले टमाटर गारपीट झाल्याने कुजले असून जवळपास पाच लाखांचे नुकसान झालं आहे.