उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाची चतुःसूत्री, 'अशा' प्रकारे करा उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन मगच मिळेल अधिकचे उत्पन्न
Poultry Farming: परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम जी निकम यांनी उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाबाबत नेमकी चतुःसूत्री सुचवलेली आहे.
परभणी : शेतकऱ्यांना आपल्या शेती बरोबरच चांगल्या प्रक्रारे आर्थिक स्थैर्य देणारा जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन (Poultry Farming) आहे. मात्र उन्हाळ्यात योग्य व्यवस्थापनाअभावी मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची मर होते. हे टाळण्यासाठी योग्य पद्धतीने कोंबड्यांना शेड, पाणी, खाद्य आणि लसीकरण करण्याची चतुःसूत्री कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी अवलंबने गरजेचे आहे. परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम जी निकम यांनी उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाबाबत नेमकी चतुःसूत्री सुचवलेली आहे.
उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाबाबत सुचवलेली चतुःसूत्री
शेड व्यवस्थापन (Shelter)
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यानंतर तापमान वाढ मोठ्या प्रमाणावर होते आणि यामुळे कोंबड्यांच्या वाढीवर परिणाम होऊन त्यांच्या मरीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोंबड्यांना ठेवलेल्या शेडचे तापमान हे किमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवावे. शेडवर गवत, ग्रीन मॅट अंथरावे किंवा पांढरा रंग ही शेडच्या पत्र्यांवर मारता येईल. जेणेकरून शेडच्या आतमध्ये गरम न होता उष्णता कमी राहील..
पाणी व्यवस्थापन (Water Management)
कोंबड्यांमध्ये घाम ग्रंथी नसल्याने उष्णतेचा मोठा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे उन्हळ्यात त्यांच्या शरीराचे तापमान जेवढे कमी ठेवता येईल तेवढे ठेवावं लागते, जेणेकरून कोंबड्या तंदुरुस्त राहावे. या काळात त्यांना उन्हाळ्यात कोंबड्यांना दूषीत पाणी पुरवठा होऊ नये यासाठी पाणी पाजताना क्लोरीन, आयोडीन, हायड्रोजन पॅराऑकसाईड हे पाणी शुद्धीकरण करणारे घटक वापरणे गरजेचे आहे. तसेच खाद्यापेक्षा पक्षांना पाण्याची उपलब्धता जास्त प्रमाणात केली गेली पाहिजे.
खाद्य व्यवस्थापन (Food Management)
कोंबड्यांना दुपारी 12 ते ३ च्या दरम्यान खाद्य हे कमी द्यायला हवं. कारण खाद्यातून मोठी ऊर्जा मिळते. त्यातून उष्णता निर्माण होऊन पंखांची मर होऊ शकते. त्यामुळे पक्षांना उन्हाच्या भर प्रहरात खाद्य न देणे हेच उत्तम..
लसीकरणाचे व्यवस्थापन (Vaccine Management)
उन्हाळ्यात पक्षांना विविध आजार जडत असताना त्यामुळे लसीकरण करणे हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लासोटा नावाची लस पक्षांना दर दीड महिन्याला द्यावी. त्या आधी पक्षांना जंतनाशक औषधे द्यावी. महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामुळे पक्षांना आलेला ताण कमी करण्यासाठी जीवनसत्व क, अ, तसेच व्हिटॅमिन बी हे पक्षांना पाण्याच्या माध्यमातून द्यावे.