(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Price Issue : बळीराजा रडला, कांदा दोन रुपये किलो; 17 गोण्या विकल्यानंतर हाती फक्त एक रुपया
Onion Price Issue : 844 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याच्या हाती फक्त एकच रुपया आला असल्याची घटना घडली आहे. सत्तेवरून राजकारण रंगत असताना दुसरीकडे शेतकरी वाऱ्यावर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Onion Price Issue : सध्या पडलेल्या कांद्याच्या भावामुळे (Onion Price) शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. नगरच्या बाजारपेठेमध्ये एका शेतकऱ्याच्या (Farmers) कांद्याला प्रति किलोसाठी अवघ्या दोन रुपयांचा भाव मिळाला. शेतकऱ्यांने 17 गोणी कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला आहे. बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक होत असली तरी बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मालाला भाव नाही पण साठवणूक देखील परवड नाही. सडून जाण्यापेक्षा दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी कांदा विकत आहेत. मात्र, तिथेही त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. नामदेव लटपटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नामदेव लटपटे यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा अहमदनगरच्या बाजारपेठेत घेऊन गेले. या ठिकाणी 17 गोणीतील कांद्याचे 844 किलो वजन भरले. या कांद्याला दोन रुपये प्रति किलोचा भाव या कांद्याला मिळाला. एकूण पट्टी झाली 1688 रुपये यातून 1461 रुपये गाडीचे भाडे झाले. तर, 221 रुपये उचल केली आणि इतर खर्च पाच रुपये झाले. हे सगळे वजा होतात केवळ एक रुपया या शेतकऱ्याच्या हातात पडला.
तीन महिन्यापुर्वी 20 गुंठे क्षेत्रात कांदा लावला होता. या उत्पादनासाठी 30 हजार रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर त्यांना बाजारात दोन रूपये किलोचा भाव मिळाला आणि हातात एक रूपया आला. नफ्याची शेती तर सोडाच मात्र तीस हजार रुपयाचा खर्च झाल्यानंतर एक रुपया सुद्धा या शेतकऱ्याला मिळाला नाही उलट करून पैसे घालून शेती करण्याची वाईट वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
सरकार दखल घेईल का?
कांद्याभोवती फिरणार अर्थ कारण इतके मोठे आहे की याच कांद्या च्या वाढलेल्या भावामुळे सरकार पडले होते हा इतिहास आहे. पण आपली व्यवस्था ही ग्राहकभिमुख असल्यामुळे ग्राहकांना महागाचा कांदा घ्यावा लागला की याची दखल थेट सरकार घेते. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा विकायचा असतो त्यावेळेस मात्र सरकार हलत नाही हेच यापूर्वी सुद्धा अनेकदा पाहायला मिळाले आहे अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना किमान 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या; किसान सभेची मागणी
कांद्याचे विक्रीदर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना सहाय्य करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने (All India Kisan Sabha) खुले पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान ६०० रुपये अनुदान द्यावे, त्याच बरोबरीने परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपाययोजना तातडीने आखण्याची आग्रही मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Onion : धाराशिवमधील अपसिंगा गावाला कांद्यानं रडवलं, कांद्याचे भाव गडगडले आणि शेतकऱ्याची मेहनत वाया