Onion : धाराशिवमधील अपसिंगा गावाला कांद्यानं रडवलं, कांद्याचे भाव गडगडले आणि शेतकऱ्याची मेहनत वाया
Onion Price : अपसिंगा या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवण केली आणि नेमका कांद्याचा भाव गडगडला... त्यामुळे या गावातील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
धाराशिव: कांदा पिकवल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी आणि गावं समृद्ध झाली आहेत. पण हाच कांदा अनेकदा शेतकऱ्यांना रडवतानाही दिसतो. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अपसिंगा गावाची झाली असून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे.
धाराशिवमधील अपसिंगा गाव कांद्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. अपसिंगा गावात 2500 हेक्टर जमीन क्षेत्र असून त्यापकी 1480 हेक्टर जमिनीवर कांदा लागण केली आहे. कांदा कवडीमोल भावाने विकला जात असल्याने अपसिंगा गावातील श्रीहरी भाकरे या शेतकऱ्याने तर कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही म्हणून आपल्या शेतातील तीन एकर कांदा कुळवण टाकलाय. कुळवण्यासाठीही ट्रॅक्टरच्या खर्चासाठी उसनवारी केलेली असून तीन एकर कांदा कुळवण्यासाठी त्यांना 2400 रुपये खर्च आला आहे. कांदा कुळवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आपल्या हृदयावर दगड ठेवून भाकरे यांनी तो कुळवून टाकला.
अपसिंगा गावातील इयत्ता तिसरीत शिकणारी धनश्री कोल्हे आपल्या बापाने लावलेल्या दोन एकर कांद्याची वेचणी करत आहे. तिला या कांद्याला किती भाव आहे याची कल्पना ही नाही, परंतु आपल्याला नवीन कपडे घेण्याचा तिने बापाकडे हट्ट केला आणि बाप म्हणाला शेताला शेतात कांदे वेचायला चल, मजूर मिळत नाहीत. त्यामुळे तिसरीत शिकणारी धनश्री आपल्या बापाला शेतात कांदा वेचणीसाठी मदत करत आहे, कारण तिला नवीन कपडे हवे आहेत.
गणेश शिवाजी आदलिंगे यांना दोन एकरमध्ये कांदा लावला. कांदा लावायला एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च आला आणि कांद्याला 9 ते 10 रुपये दर असल्याने 60 हजार रुपये हातावर येतील. त्यामुळे गणेशला यातून काहीच फायदा झाला नाही, त्याची मेहनत वाया गेली.
सचिन दीक्षित यांना आपल्या दोन एकर कांद्यातून फक्त 32 हजार रुपये मिळाले. त्यातून झालेला खर्च ही निघाला नाही, त्यामुळे उद्विग्न झालेल्या सचिन हे मुख्यमंत्र्याला एकच विनंती करत आहे, 'साहेब, तुम्ही आमच्या शेतावर एकदा येऊन आमची शेती आणि शेतकऱ्यांचे हाल बघाच.'
या वर्षी अधिक भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा लागवड वाढवली आहे. राजस्थान, दाक्षिणात्य राज्य इथही कांदा लागवड वाढली आहे. या वर्षी हवामान अनुकूल आहे. या सगळ्यामुळे नियमीत कांदा उत्पादक भागाला फटका बसला आहे. सध्या लाल कांद्याची साठवण अधिक काळ करता येत नाही. मागणी तर तेवढीच आहे. त्यामुळे कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. बांग्लादेश, श्रीलंकेला तिथल्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यापारी कांदा पाठवत नाहीत. पाकिस्तानात तर मोठे आर्थिक संकट आहे.
धाराशिव जवळील अपसिंगा गाव मराठवाड्यातले सर्वात मोठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या वर्षी अधिक भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा लागवड वाढवली आहे. त्याचा फटका अपसिंगा गावाला बसला आहे.
ही बातमी वाचा :