Nandurbar: कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, पिकांची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Maharashtra News: केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे.
नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे.
थंडीच्या काळात केळी बागांची काळजी कशी घ्यावी?
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर केळीचे पीक आहे. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कडाक्याची थंडी केळीवरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या बागांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. केळीच्या पिकांमधील उष्णता कायम राहण्यासाठी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे त्याचसोबत बागांमध्ये शेकोटी पेटवून धूर केल्यास तापमान कायम राहते. अशा प्रकारची काळजी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक पद्माकर कुंदे यांनी केले आहे.
कमी तापमानाचा केळीच्या बागांवर होणारा परिणाम
- कमी तापमानात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते.
- कमी तापमानामुळे केळीचा फळाला तडे जाण्याची ही शक्यता असते.
- तापमान कमी असताना रात्रीच्या वेळेस बागांना पाणी दिल्यास बागांमधील तापमान कायम ठेवण्यास मदत होते.
- तापमान कमी झाल्यास बागांमध्ये शेकोटी करून बागेतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..
- केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करावी.
- खोडालगत आच्छादन करावे. जेणेकरून कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.
- करपा रोगनियंत्रण
हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील चार ते पाच पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो.
नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणीप्रोपीकोनॅझोल (25 ईसी) 1 मिलि किंवाका र्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 1 ग्रॅम द्रावणात 1 मिलि स्टिकर मिसळावे.