Devendra Fadnavis : निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, शेती शाश्वत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : फडणवीस
Devendra Fadnavis : राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Devendra Fadnavis : राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. सध्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain ) हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान असल्याचे ते म्हणाले. मागील नऊ महिन्यात राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम सरकारनं केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी सरकारनं चांगलं काम केलं
महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. आपलं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगलं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहे. अर्थसंकल्पात विशेष तरतूद देखील करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र राज्याने केलेली प्रगती पाहून सर्वांचे डोळे दिपून जातील. देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे फडणीस म्हणाले.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळं केंद्र सरकारनं किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विविध योजना सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांनी मागेल ते देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात भूजलसंवर्धनाची पातळी वाढली
शेतकऱ्यांना आता विम्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. एक रुपयात विमा भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. इतिहासील सर्वात मोठी मदत महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना केली आहे. सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं आहेत. त्यातीलच एक म्हणजे अवकाली पाऊस. अवेळी पडणाऱ्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे फडणवीस म्हणाले. खरीपात पाऊस पडला नाहीतर नियोजन करावं लागेल. जलसंधारणाची काम करावी लागलीत असे फडणवीस म्हणाले. जलसंधारणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं चांगले काम केलं आहे. राज्याचा पहिला क्रमांक आला आहे, याबाबत केंद्र सरकारनं राज्याचा गौरव केल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे की भूजलसंवर्धानाची पातळी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: