बीडमध्ये गोगलगायीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान, हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्या : धनंजय मुंडे
Beed News : जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिकं पूर्णत: नष्ट झाली आहेत. कृषी आणि महसूल यंत्रणेने पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी धनजंय मुंडे यांनी केली.
Beed News : बीड जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात ग्रासलं आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन (Soybean) पिकं पूर्णत: नष्ट झाली आहेत. तर सोयाबीनसह इतरही पिकांना गोगलगायीच्या (Snail) नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. याबाबत कृषी आणि महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करुन राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबणीवर होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. याच काळात बीड जिल्ह्यात पेरणी करण्यात आलेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायींच्या भक्ष्यस्थानी पडलं.
शंखी आणि अन्य प्रकारातील गोगलगायी उगवलेली रोपटी खाऊन नष्ट करत असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन-कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या परंतु त्याला खूप उशीर झाला होता. ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे सहलीवर होते आणि नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेलं नाही.
पेरणी करुन 100 टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणं आणि दुबार पेरणी करणं, असं दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांसमोर असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
दरम्यान गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान आणि प्रशासन करत असलेल्या व्यवस्थापनाची धनंजय मुंडे यांनी रविवारी (10 जुलै) अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे आदींकडूनही माहिती घेतली असून कृषी आणि महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला कळवावा. शासनाने दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करुन ती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.