Rice Farming : आता पुराच्या पाण्यातही वाचणार भाताचं पीक, जाणून घ्या 'सह्याद्री पंचमुखी' वाणाबद्दल
Sahyadri Panchamukhi: यापुढे पुराच्या पाण्यात भाताच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून कृषी तज्ज्ञांनी एका नवीन वाणाचा शोध लावलाय. 'सह्याद्री पंचमुखी' असं या विकसित केलेल्या नवीन भाताच्या वाणाचं नाव आहे.
Flood Resistant Variety of Paddy : सध्या शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहे. तसेच हवामान बदलाच्या संकटाचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हवामान बदलामुळं दुष्काळ, अतिवृष्टी, पूर अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. दरम्यान, दरवर्षी अतिवृष्टी किंवा पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांना फटका बसतो. सध्या आसासमध्ये पुराच्या संकटामुळं मोठ्या प्रमाणावर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. काढणीला आलेलं भाताचं पीक पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. दरम्यान, यापुढे पुराच्या पाण्यात भाताच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी एका नवीन वाणाचा शोध लावला आहे. 'सह्याद्री पंचमुखी' असं या विकसित केलेल्या नवीन भाताच्या वाणाचं नाव आहे.
पूर प्रतिरोधक भाताचा शोध
विभागीय कृषी आणि फलोत्पादन संशोधन केंद्राने 2019 मध्ये पूर प्रतिरोधक 'सह्याद्री पंचमुखी' हे भाताचे वाण विकसीत केलं आहे. हे वाण 8 ते 10 दिवस पुराचे पाणी सहन करु शकते. सह्याद्री पंचमुखी वाणाच्या तांदूळ पिकात 8 ते 10 दिवस जरी पाणी साचून राहिले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. तसेच या वाणाच्या तांदळाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. दरम्यान, या तांदूल पिकाची वाढ करण्यासाठी अधिक सिंचन आवश्यक आहे. त्यामुळं आसाम, कर्नाटकसह पूरप्रवण आणि किनारी भागात त्याची लागवड करणं फायदेशीर ठरु शकते.
सह्याद्री पंचमुखीची वैशिष्ट्य
सह्याद्री पंचमुखी या लाल तांदळाच्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे हे भाताचा वाण अनेक दिवस पुराच्या पाण्यात नुकसान न होता उभा राहू शकते.
पुराच्या पाण्यामुळं हा तांदूळ कुजत नाही.
पुराच्या पाण्याचा या भाताच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही.
भाताची ही जात लागवडीनंतर 130 ते 135 दिवसांत तयार होते.
इतर जातींच्या तांदळापेक्षा सह्याद्री पंचमुखीचे उत्पादन हे 26 टक्के जास्त मिळू शकते.
सह्याद्री पंचमुखी ही लाल तांदळाची सुवासिक जात आहे.
दरवर्षी पुराच्या फटक्यामुळं भात शेतीचं मोठं नुकसान होतं. मात्र पुरातही पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तांदळाचे नवीन वाण विकसीत केलं आहे. सह्याद्री पंचमुखीसारख्या तांदळाच्या नवीन वाणामुळं पुरापासून शेतकऱ्यांच्या भाताच्या पिकाचं नुकसान वाचणार आहे.
महत्वाच्या बातम्या: