Rice prices jump : बांगलादेशनं तांदळावरील आयात शुल्क केलं कमी, भारतीय तांदळाच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क कमी केलं आहे.
Rice prices jump : गेल्या पाच दिवसात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क 62.5 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यामुळं भारतीय व्यापाऱ्यांना शेजारील देशासोबत निर्यात करार करण्याची परवानगी दिली आहे. 22 जून रोजी, बांगलादेशने एक अधिसूचना आणली आहे. ज्यामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेशने तांदूळ आयात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं लवकरच भारत तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तांदळाच्या किंमतीत प्रति टन 350 डॉलरवरुन 360 प्रति टन डॉलरवर
दरम्यान, भारतानं गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळं गव्हाच्या आयातीत घट झाली आहे. अशातच यावर्षी पुरामुळं देशातील भातशेतीचं देखील नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांत, भारतीय गैर-बासमती तांदळाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत प्रति टन 350 डॉलरवरुन 360 प्रति टन डॉलरवर पोहोचल्या आहेत. बांगलादेशनं आयात शुल्क कमी केल्यानंतर या किंमतीत वाढ झाल्याचे तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष बी व्ही कृष्णा राव यांनी सांगितले. गव्हाच्या वाढत्या किंमती आणि घटती आयात यामुळे बांगलादेशात तांदळाच्या किंमती वाढल्या आहेत. आलेला पूर, वादळ आणि अतिवृष्टीमुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे.
बांगलादेश पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तांदूळ खरेदी
तांदळाच्या किंमती आधीच 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि अजूनही वाढत असल्याची माहिती तिरुपति एग्री ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज अग्रवाल यंनी दिली. बांगलादेश सामान्यतः पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार मधून तांदूळ खरेदी करतो. या तीन राज्यांमध्ये सामान्य प्रकारच्या तांदळाच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिन्ही राज्यांतील किंमती वाढल्याचा परिणाम इतर प्रदेशातील तांदळाच्या किमतींवरही झाला आहे. तिथे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बांगलादेशने नॉन-बासमती तांदूळ लवकर खरेदी केल्याने भारतीय तांदूळ निर्यातीला नवी चालना मिळेल. वाणिज्य मंत्रालय आणि सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने 2021-22 मध्ये भारतानं 6.11 अब्ज किंमतीचा नॉन-बासमती तांदूळ निर्यात केला होता.