Vegetables : 10 रुपये किलोनं विकणारी भाजी 200 रुपयांवर, अचानक दर वाढण्याचं कारण काय?
अतिवृष्टीमुळं अनेक प्रकारच्या भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळं बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक प्रभावित झाल्याने भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत.
Vegetables Rates : देशातील काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे, तर काही भागात पावसानं दडी मारली आहे. काही राज्यात तर अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं पिकांचं देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे वांगी, फ्लॉवर, परवळ, मुळा यासह अनेक प्रकारच्या भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळं बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक प्रभावित झाल्याने भाजीपाल्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सध्या बिहारमध्ये (Bihar) भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
एक किलो दोडक्यासाठी बिहारमध्ये मोजावे लागतायेत 200 रुपये
बिहारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा महागाई वाढली आहे. विशेषतः भाज्यांचे भाव वाढले आहेत. महागाईची स्थिती अशी आहे की, अनेक भाज्यांचे भाव 100 रुपये किलोच्या जवळपास पोहोचलेत. तर काही भाज्यांचे दर हे 200 रुपये किलोंच्या आसपास पोहोचले आहेत. 10 रुपये किलोनं मिळणाऱ्या भाज्या आज 200 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. दोडक्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. एक किलो दोडक्यासाठी बिहारमध्ये 200 रुपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसांच्या ताटातून हिरव्या भाज्या गायब झाल्या आहेत.
चार-पाच दिवसांत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले
राजधानी पाटणासह संपूर्ण बिहारमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. खराब हवामानामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचे दर किलोमागे 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत.गेल्या चार-पाच दिवसांत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तेथील स्थानिक भाजी दुकानदार सांगतात. चार दिवसांपूर्वी 40 रुपये किलोने विकली जाणारी फुलकोबी आता 60 ते 80 रुपये किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो, नेनुआही महागले आहेत. या दोन्ही भाज्या 30 रुपये किलोने विकल्या जात आहेत.
नवरात्रीच्या काळात त्यांच्या किमतीही वाढू शकतात.
बिहारमध्ये दोडका सर्वात जास्त महाग झाला आहे. एक किलो दोडक्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. मागील काही दिवसापूर्वी दोडके 10 ते 20 रुपये किलोने विकले जात होते. मात्र सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळं भाजीपाल्याची फुले गळून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मुळा, वांगी, कोबीसह इतर भाजीपाल्याची पिके शेतातच खराब झाली. अशा स्थितीत भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: