Agriculture News : तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसं कराल नियंत्रण? काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला
तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यावर नेमकं नियंत्रण कसं करावं याबाबतचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
Agriculture News : राज्यात तुरीचा (Tur) हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं राज्यातील तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) मोठ्या प्रमाणावर तुरीचं क्षेत्र आहे. या ठिकाणचे क्षेत्र बाधित झालं आहे. मात्र, याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) दिला आहे. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमकं काय करावं याचा सल्ला देखील कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
दोन ते तीन लाख हेक्टरवरील तुरीचे पीक बाधित
सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख हेक्टरवरील तुरीचे पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालं आहे. या शेंगा पोखरणाऱ्या किडीवर नेमकं नियंत्ऱण कसं करायचे याबाबतची माहिती पंजाबरावर देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिली आहे.
अशी करा तुरीवर फवारणी
1) पहिल्या फवारणीत सर्वात आधी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा 300 पीपीएम अझॅडॅरेक्टीन 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
2) जास्त प्रादुर्भाव असेल तर 1500 पीपीएम अझॅडॅरेक्टीन 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
3) प्रादुर्भाव दोन ते तीन अळ्या प्रती झाड आढळल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारावे.
4) 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टीन बेनझॉईट 3 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
5) तसेच क्लोरेनट्रेनीफॉल 18.5 टक्के 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
ही माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे शास्त्रज्ञ डॉ. प्रविण राठोड यांनी दिली आहे. तुरीच्या पाहणीत जर फुले, कळ्या आणि शेंगा जर किडग्रस्त आढळल्या तर आपल्याला प्रादुर्भाव नेमका कशाचा आहे समजेल असेही राठोड म्हणाले. त्यामुळं पीक वाचण्यासाठी फवारणी आवश्यक असल्याचे राठोड म्हणाले.
विदर्भ आणि मराठवाड्याला फटका बसण्याची शक्यता
शेंगा पोखरणाऱ्या या किडीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तुरीचं पिक शेंगावर आल्यानंतर तीन किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिकावर होत आहे. यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंग माशी या तीन किडींचा समावेश असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रेरणा चिकटे यांनी दिली. एका झाडावर जर दोन ते तीन अळ्या आढळल्या तर त्याची फवारणी करणे गरजेचे आहे.
तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता
राज्यातील सोयाबीननंतर महत्वाचं नगदी खरीप पीक म्हणजे तूर. यावर्षीच्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा सोयाबीनचा घास हिरावला आहे. आता सर्व आशा आहे ती तूर पिकावर. मात्र, तूर पिकालाही आता 'अस्मानी' संकटानं घेरलं आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा भागात तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा थेट परिणाम तूर उत्पादनावर होणार आहे. आधीच देशाचं तूर उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5 लाख मेट्रीक टननं कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भातील जिल्हानिहाय तुरीचं लागवड क्षेत्र
जिल्हा क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अमरावती 1.15 लाख
वाशिम 58160
चंद्रपूर 34311
भंडारा 10567
वर्धा 58564
अकोला 56777
महत्त्वाच्या बातम्या: