कारखानदार शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारतायेत, राजू शेट्टींचा हल्लाबोल, साखर आयुक्तांना लिहलं पत्र
राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.
Raju Shetti : साखर कारखान्यांकडे (Sugar Factory) एफआरपीची (FRP) रक्कम अदा करुन पैसे शिल्लक राहिले आहेत. सदरचे पैशावरती शेतकऱ्यांचा (Farmers) अधिकार आहे. पण राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला. याबाबत राजू शेट्टींनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांनी पत्र लिहलं आहे. या पत्रात राजू शेट्टींनी नेमकं काय म्हटलंय ते पाहुयात.
राजू शेट्टींनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
गेल्या दोन वर्षापासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे. यामुळं साखर कारखान्यांकडे एफ. आर. पी. ची रक्कम अदा करुन पैसे शिल्लक राहिले आहेत. सदरच्या पैशांवरती शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होवून या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यामुळं गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे केलीय.
कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक
गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॅाल निर्मीती करण्यास प्राधान्य दिले. यामुळं साखर, इथेनॅाल, बगॅस, को -जन, स्पिरीट, अल्कोहोल, मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. यामुळं साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले आहेत. गतवर्षी राज्यातील सोमेश्वर, माळेगांव, विघ्नहर, भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेस मंजूरी घेऊन शेतक-यांना त्यांच्या हक्काचे जादा पैसे दिले आहेत. मात्र याप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचे कारण दाखवत शासनाकडे बोट दाखवून सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करुन या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
उपपदार्थाच्या उत्पन्नातील ज्यादाचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावे
चालू हंगामातील साखर व उपपदार्थाच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आताच साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजूरी घेण्याबाबत लेखी आदेश काढून कळवण्याबाबतची मागणी केली आहे. यामुळं राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करुन या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Raju Shetti : शेतकऱ्यांनी डोळे मोठं करताच सरकारने निर्णय घेतला, उमेदवार धडाधड पाडायला सुरुवात केल्यास कोणतंही सरकार वठणीवर येईल; राजू शेट्टींचा हल्लाबोल