Sindhudurg News : तिलारी खोऱ्यात हत्तींचा धूमाकूळ, भात शेतीच मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींनी (Elephants) धुमाकूळ घातला आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींनी (Elephants) धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग मधील केर गावातील भात शेती हत्तींनी अक्षरशः पायदळी तुडवून टाकली आहे. तर हत्ती बागायती शेतीचं प्रचंड मोठं नुकसान करत आहेत. त्यामुळं तेथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. हत्तींनी दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये भितीच वातावरण आहे.
पावसाळा सुरु झाला की, हत्ती कर्नाटक राज्यात निघून जायचे. 2001 पासून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले, मात्र पावसाळ्यात हत्ती जिल्ह्यात न राहता कर्नाटकमध्ये निघून जायचे. मात्र, यावर्षी हत्ती कर्नाटकमध्ये न जाता दोडामार्गमधील केर गावात ठाड मांडून आहेत. इथल्या भातशेतीसह नारळ, सुपारी, काजूच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ, शेतकरी भयभीत
काही दिवसांपूर्वीच तिलारीच्या खोऱ्यात पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार करत असतानाचा व्हिडीओ ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी टस्कर, मादी आणि त्यांची तीन पिल्ले असा एकूण पाच हत्तींचा कळप केर, मोर्ले गावात दाखल झाला. शेती, फळ बागायती, सुपारी, माड जमीनदोस्त करत या हत्तींनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांना आवश्यक असणारा मुबलक अन्नसाठा तेथे उपलब्ध असल्याने हे हत्ती येथे तळ ठोकून आहेत. हे हत्ती कधी केर तर कधी मोर्ले गावात मुक्त संचार करतात. तर तस्कर हत्तीमध्ये एकटा फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे शेतकरी शेती करायची की नाही या विवंचनेत आहे.
कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या रानटी हत्तींचे मार्ग कसे रोखता येतील, त्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. हत्तीबाधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव स्वरुपात नुकसान भरपाई कशी देता येईल याचाही विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. कर्नाटकातील रानटी हत्ती हे दोडामार्ग तालुक्यातील केवळ मांगेली येथूनच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड मार्गे देखील सिंधुदुर्गात येतात. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यात हत्तीकडून हैदोस घातला जातो. काही दिवसापूर्वी हत्तींनी केळीच्या आणि काजूच्या बागांचे देखील नुकसान केलं होतं. तर काही ठिकाणी नारळ, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तिलारी खोऱ्यात गेले तीन-चार महिने हत्ती नुकसान करत आहेत. वन विभाग फक्त पाहत आहे. हत्तीग्रस्त भागातील लोकांनी जगायचे कसे? हत्तीच्या भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत. घरात राहून संसाराचा गाडा कसा हाकायचा असे अनेक प्रश्न स्थानिकांना पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sindhudurg News : तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुडगूस; केळी, काजू, नारळ, पोफळीच्या बागांचं मोठं नुकसान
- Sindhudurg Farmers : तळकोकणातल्या तिलारी खोऱ्यात हत्तींचा उच्छाद, बागायती शेतीचं मोठं नुकसान