PM Narendra Modi : मृदा समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मृदा संवर्धनासाठी 'या' पाच गोष्टीवर लक्ष : पंतप्रधान
मृदासंबंधी समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. मृदा संवर्धनासाठी सरकारनं पाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केल्याचे मोदी म्हणाले.
PM Narendra Modi : मातीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रामुख्याने प्रयत्न केले जात असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले. पूर्वी आपल्या देशातील शेतकऱ्यांना मातीचा प्रकार, मातीतील उणिवा, पाणी किती आहे याबाबत माहिती नसायची. आता या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याची मोठी मोहीम राबवण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. माती वाचवण्यासाठी सरकारने पाच मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याची माहितीही त्यांनी दिली.
ईशा फाउंडेशनने आयोजित केलेल्या मृदा संरक्षण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. प्रारंभी पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. मृदा संरक्षण चळवळीचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान नवनवीन प्रतिज्ञा घेत असताना अशा चळवळींना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या 8 वर्षातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षणावर भर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वच्छ भारत अभियान किंवा कचऱ्यातून संपत्ती निर्मितीशी संबधी उपक्रम, सिंगल यूज प्लॅस्टिक कमी करणे, एक सूर्य एक पृथ्वी किंवा इथेनॉल मिश्रण ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारताच्या बहुआयामी प्रयत्नांची उदाहरणे दिली.
माती वाचवण्यासाठी सरकारनं या पाच मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे
माती रसायनमुक्त कशी करावी.
मातीतल्या जीवांचे संरक्षण, ज्याला तांत्रिक भाषेत मृदा सेंद्रिय पदार्थ म्हणतात. जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा, पाण्याची उपलब्धता कशी वाढवायची. कमी भूजलामुळे जमिनीचे होणारे नुकसान कसे दूर करायचे
जंगले कमी झाल्यामुळे मातीची सतत होणारी धूप कशी थांबवायची.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील संसाधनांचे अधिकाधिक शोषण करत असून बहुतांश कार्बन उत्सर्जन या देशांकडून होत आहे. जगाचा सरासरी कार्बन फूटप्रिंट प्रति व्यक्ती वर्षाला सुमारे 4 टन आहे. त्या तुलनेत भारतात प्रति व्यक्ती तो केवळ सुमारे 0.5 टन आहे. भारत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्याने दीर्घकालीन दृष्टिकोनावर काम करत आहे आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यासारख्या संस्था भारताने स्थापन केल्या आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.