Dhule News : वाढत्या थंडीचा परिणाम दुभत्या जनावरांवर, शरीरातील उष्णता कमी झाल्याने दुधाच्या उत्पन्नात घट होणार
Dhule News : थंडीचा परिणाम दुभत्या जनावरांवर देखील होत आहे. यामुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाने केलं आहे.
Dhule News : संपूर्ण राज्यात एकीकडे तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने थंडीचा (Cold) गारठा चांगलाच वाढला आहे. या थंडीचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर होतो तसा तो दुभत्या जनावरांवर (Milch Animals) देखील होत आहे. यामुळे दुधाच्या (Milk) उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट
संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर घसरत असून उत्तर महाराष्ट्र यंदाच्या हंगामात सर्वाधिक गारठला आहे. नाशिक जिल्ह्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसवर तर ओझरचे तापमान सहा अंशावर येऊन ठेपले आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्याचे तापमान सात अंशावर आल्याने कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीचा परिणाम हा जनावरांवर देखील होत आहे. यामुळे दूध उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण घटल्याने त्याचा परिणाम दुधावर देखील होत असतो. हिवाळ्यापूर्वी नऊ ते दहा लिटर दूध देणारी जनावरे तापमानात घट झाल्यानंतर चार ते पाच लिटर दूध देऊ लागली आहेत. यामुळे पशुपालकांनी देखील जनावरांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. जनावरांच्या गोठ्यात शेकोटी पेटवणे, तसेच जनावरांचे अंग झाकणे त्यांच्या शरीरातील उष्णता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे असे उपाय पशुपालकांकडून केले जात आहेत.
उबदार वातावरण निर्माण करुन जनावरांची काळजी घ्या : पशुसंवर्धन विभाग
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत असून पुढील काही दिवसात देखील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी तसेच लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतर आजारांची देखील जनावरांना लागण होण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी जनावरांना जास्तीत जास्त उबदार वातावरण निर्माण करुन द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी राजेंद्र लंघे यांनी केलं आहे.
थंडीत जनावरांची कशी काळजी घ्यावी?
- जनावरांना रात्रीच्यावेळी शेडमध्ये किंवा गोठ्यातच बांधावे
- तसेच रात्रीच्या वेळी जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकावे
- त्याचबरोबर गोठ्यामध्ये ऊब निर्माण व्हावी यासाठी शेकोटी पेटवावी
- जनावरे शेडमध्ये बांधलेल्या ठिकाणी उघडी असलेली बाजू कापडाने किंवा आणखी पर्यायी मार्गाने झाकावी जेणेकरुन वारा आत येऊन जनावरांना थंडी जाणवणार नाही