Bhandara News : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी संतप्त, महिनाभरापूर्वी कापलेलं धान पडून
Bhandara News : धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कापलेले धान महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरात किंवा शेतावर पडून आहे. यामुळे उंदीर, घुस आणि श्वापदांचा उद्रेक वाढला असल्याने शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकलं आहे.
Bhandara News : धान खरेदी केंद्र (Paddy Purchase Centre) दिवाळीपूर्वी सुरु झालं असतं तर, आम्हीही आमच्या परिवाराला राज्य सरकारमधील आमदारांसारखे गुवाहाटी नाही तर किमान अजिंठा, वेरुळला फिरायला नेलं असतं, असा उपरोधिक टोला आणि वास्तववादी कैफियत भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी मांडली आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. त्यामुळे अजूनही अनेक शेतकरी (Farmers) त्यांचे धान विकण्यापासून वंचित आहेत. केंद्र सुरु व्हावीत आणि तिथे त्यांच्याकडील धान विकून त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
कापलेले धान महिनाभरापासून घरात किंवा शेतावर पडून
धान (Paddy) उत्पादक जिल्हा म्हणून भंडाऱ्याची ओळख आहे. शेतकऱ्यांनी खरिपात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली. दरवर्षी दिवाळीपूर्वी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होत होती. मात्र, यावर्षी दिवाळी (Diwali) लोटूनही खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. दरवर्षी दिवाळीत धान खरेदी केंद्र सुरु होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान कापणी केली. मात्र, खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कापलेले धान महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरात किंवा शेतावर पडून आहे. यामुळे उंदीर, घुस आणि श्वापदांचा उद्रेक वाढला असल्याने शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकलं आहे. पणन विभागाने काही केंद्र सुरु केलेली असली तरी, प्रत्यक्षात अजूनही काही केंद्र सुरु झालेली नसल्याने शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचे संकट ओढवलं आहे. अनेकांकडे धान ठेवण्यासाठी जागा नसतानाही घरात किंवा अंगणात तर, काहींना शेतात उघड्यावर ठेवावं लागत आहे. यात शेतातील धानाच्या सुरक्षेसाठी त्यांना कुडकुडत्या थंडीत रात्री शेतात झोपावं लागत असून तिथे त्यांना हिंस्त्र प्राण्यांचाही धोका पत्करावा लागत आहे.
शेतकरी आर्थिक विवंचनेत
दिवाळीपूर्वी धान कापणी झाली. मात्र, केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. तर, वेळेत केंद्रावर धानाची विक्री झाली असती तर, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजाही कमी झाला असता. मात्र, केंद्र सुरु होण्यास विलंब लागल्याने अजूनही शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तर, दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील 233 आधारभूत केंद्राला मान्यता मिळाली असून 189 केंद्र सुरु झाले असून 120 केंद्रावरुन धान खरेदी सुरु झाल्याचा दावा केला आहे.
उशिरा का होईना शेतकऱ्यांचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर शासनाने त्वरित घ्यावं, अशी मागणी शेतकरी करत आहेत.