Rahibai Popere : अतिवृष्टीचा बीजमाता राहीबाईंना फटका, तब्बल तीन वेळा केली भाजीपाल्याची लागवड
अतिवृष्टीचा फटका बीजमाता राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांना देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळं त्यांना तब्बल तीन वेळा भाजीपाला पिकांची लागवड करावी लागली आहे.
Rahibai Popere : यावर्षी परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं देखील वाया गेली आहेत. या अतिवृष्टीचा फटका बीजमाता राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांना देखील बसला आहे. अतिवृष्टीमुळं त्यांना तब्बल तीन वेळा भाजीपाला पिकांची लागवड करावी लागली आहे. पावसामुळं लावलेली पीक वाया गेल्यानं त्यांना पुव्हा पिकांची लागवड करावी लागली आहे. त्यासाठी घरात जतन केलेले सर्व देशी बियाणे त्यांनी शेतात पेरावे लागले.
यावर्षी राज्यातील बहुतांश भागात यावर्षी जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. काढणीला आलेली पीक यामुळं वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बीजमाता म्हणून ओळख असलेल्या राहिबाई पोपेरे यांना देखील यांनी देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसामुळं लागवड केलेल्या भाजीपाल्याचे पीक वाया गेल्यानं त्यांना तब्बल तीन वेळा पिकाची लागवड करावी लागली. यामुळं पिकाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती राहिबाई पोपेरे यांनी दिली. जिद्दी आणि कष्टाळू असणाऱ्या राहीबाईंनी निसर्गापुढं हार न मानता तिनवेळा गावरान बियाणांची उत्पादनासाठी लागवड केली आहे. घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध पिकांचा भाजीपाल्याची लागवड करत त्यांनी बियाणे निर्मिती करण्यात यश मिळवले आहे.
कोण आहेत राहिबाई पोपेरे
राहीबाई पोपेरे यांना ओळखत नाही असा आज महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही, गाव नाही. परराज्यात देखील राहीबाईंचं काम पोहोचलय. त्यांच्या कामाची दखल सरकारनं सुद्धा घेतलीय. सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पदमश्री या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कोणतंही शिक्षण झालं नसतानाही शेती क्षेत्रात देशी बीज संवर्धनाचं मोठं काम राहिबाईंनी केलं आहे.
200 हून अधिक बियाणांची देशी वाण
राहीबाई यांचं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळने हे गाव. त्यांचा जन्मही याच गावात झाला आणि त्यांचं सासरची हेच गाव. या लहानश्या गावात राहीबाईंनी मोठं काम केलं आहे. त्यांच्याकडे 52 हून अधिक पिकांची 200 हून अधिक बियाणांची देशी वाण आहेत. 114 रजिस्टर केलेली वाण आहेत. दुर्मिळ होत चाललेल्या बियाणांच्या सर्व वाणांचं जतन त्यांनी केलं आहे. राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. तसेच भाताच्या 16 जाती आहेत. त्याचबरोबर नाचणी, मूग, हरभरा, कारले, दोडका, पालक, गोसावळा, मेथी, भेंडी, गवार, विविध प्रकारच्या रानभाज्यांची वाण त्यांच्याकडे आहेत.
राहीबाईंनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. तसेच ज्यांना गरज आहे, त्यांना विक्री देखील केली जाते. या कामात सुरुवातीला त्यांना 'बायफा' या संस्थेची खूप मोठी मदत झाली. त्यातूनच त्यांनी हे मोठं काम उभा केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: