Raksha Bandhan :बीजमाता राहीबाई पोपेरेंकडून भाऊ चंद्रकांत पाटलांना बीज राखी; कशी बनवली ही राखी...
Rakhi Purnima 2022 : चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने त्यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी दादांसाठी ही अनोखी भेट पाठवली आहे.
Rakhi Purnima : 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया' अगदी या गीताला शोभेल अश्या पद्धतीने अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (बीजमाता ) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी आणि जगावेगळी भेट दिलेली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या असून चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने त्यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी दादांसाठी ही अनोखी भेट पाठवली आहे.
राहीबाई पोपेरे यांनी बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असतं हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे.
राहीबाई पोपेरे यांनी म्हटलं की, मी आज राखीपौर्णिमेच्या निमित्तानं बीज राखी बनवल्या आहेत. मी सीमेवरील जवानांना या राख्या पाठवल्या आहेत. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला बहिण मानलं आहे. मी त्यांनाही राखी पाठवली आहे. बहिण भावाचं नातं हे सर्वोत्कृष्ट आहे. हे नातं जपलं जावं. भावा बहिणीचं नातं निसर्गासारखं आहे. निसर्गासारखं आपल्या बहिणीची काळजी घ्या. सर्व शेतकरी बांधवांना, जवानांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं राहीबाई पोपेरे यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत 'बीजमाता' राहीबाई पोपेरे
महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे. राहीबाई पोपेरे यांना 2020 साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते. शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. या घराला पावसाळ्यात गळती लागली होती. राहीबाईंच्या देशी बियाणांच्या बँकेला सुरक्षित आसरा मिळावा म्हणून एबीपी माझानं बातम्यांच्या स्वरूपात विशेष मोहीम राबवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
बीजमातेचा मोठा सन्मान, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार, बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता'
महिला दिन विशेष : 'बीजमाता' राहीबाई पोपेरेंसह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान