Success Story : आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या तरुणाची मातीशी नाळ; उभारला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, मिळतंय लाखोंचे उत्पन्न
Nanded News : युवकाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून या खत निर्मिती मधून हा युवक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.
नांदेड : आयआयटीमधून उच्च शिक्षण घेतलेल्या युवकाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून या खत निर्मिती मधून हा युवक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे राहणाऱ्या तरुणाने जवळच पिंपळाभत्या येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रज्ञानंद पोहरे असे या तरुणाचे नाव आहे. बेंगळुरू येथे सध्या तो एका कंपनीमध्ये कार्यरत आहे. नोकरीचे स्वरुप ऑनलाईन असल्याने मिळालेल्या मोकळ्या वेळेत त्याने हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.
गांडूळ खत प्रकल्पासाठी त्याने हरियाणा राज्यातून ऑस्ट्रेलियन प्रजातीचे गांडूळ मागवले आहेत. या गांडूळाच्या माध्यमातून खत निर्मिती तसेच वर्मीवॉश हे फवारणी औषध तयार करण्यात येते. या गांडूळ खताला मोठी मागणी आहे. या खत निर्मिती सोबतच पिकांवरील कीटकनाशकाचा नायनाट करण्यासाठी वर्मीवॉश या फवारणी औषधाची देखील या ठिकाणी विक्री केली जात आहे. गांडूळ खत आणि वर्मीवॉश या औषधाच्या माध्यमातून प्रज्ञानंद पोहरे हा तरुण लाखो रुपयांची कमाई करीत आहे.
>> गांडुळ खताचे फायदे
> जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
> जमिनीचे बाष्पीभवन कमी होवून पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
> जमिनीत गांडुळांची संख्या वाढते, त्यामुळे जमीनी भुसभुशीत होऊन उगावु बनते.
> झाडांची निरोगी वाढ होते, त्यामुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत होते.
> जमिनीत हवा खेळती राहून, मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळे फळांमध्ये टिकाऊपणा आणि चव येते.
>> वर्मी वॉश चा वापर कसा करावा
प्रज्ञानंदने आइसीनिया फोटिडा नावाचे ऑस्ट्रेलियन प्रजातीचे गांडूळ हरियाणा राज्यातून मागून गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. आइसीनिया फोटिडा नावाचे गांडूळ हे उच्च तापमानात आणि कमी तापमानात, कमी पाण्यावर जगू शकतात. 90 टक्के शेणखत आणि 10 टक्केच माती खातात. त्यामुळे बाजारात या प्रजातीची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ते गांडूळ निर्मितीसाठी योग्य मानले जातात.
वर्मी वॉश म्हणजे काय?
गांडूळाच्या शरीरापासून जे पाणी निघते त्याला वर्मीवॉश असे म्हणतात. एका ड्रॉप मध्ये गांडूळ आणि शेणखत टाकून दोन महिन्यापर्यंत त्यात पाणी सोडले जाते. गांडूळापासून ते पाणी निघते ते वर्मीवॉश म्हणून वापरले जाते. त्यामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव दूर होऊन पिकांवरील कीटकांचा नाश होतो. एक लिटर वर्मीवॉश मध्ये आठ लिटर पाणी टाकून शेतीवर सकाळी किंवा सायंकाळी सूर्योदय किंवा सूर्यास्तानंतर फवारल्यास पिकांवरील रोगराई दूर होते. वर्मीवॉशमध्ये झाडांना, जमिनीला लागणारे न्यूट्रियन्स म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असतात. तसेच वर्मीवॉशमध्ये मायक्रो न्युट्रियन्स बोरोंनस, झिंक , मॅग्नेशियम असतात. त्यामुळे वर्मीवॉशला ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रचंड मागणी आहे.