Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Amravati rada in Navneet Rana Rally: नवनीत राणा यांच्या सभेत गोंधळ. दोन गटांमध्ये राडा. नवनीत राणा यांच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न
अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना दर्यापूर मतदार संघातील रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उपस्थितीत खल्लार येथे जाहिर सभेचे आयोजन खल्लार येथे करण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रचारसभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाल्या असताना अज्ञात विशिष्ट एका गटाने नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खल्लार गावात चांगलेच वातावरण तापले होते. यावेळी खुर्च्यांची फेकफाक करुन अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला होता. काही जण तर नवनीत राणाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. एका जमावाने नवनीत राणा यांच्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या. या हल्ल्यात युवा स्वाभिमान पक्षाचे (Yuva Swabhiman) युवा जिल्हाप्रमुख आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांना दुखापत झाल्याचे समजते.
यावेळी मोठ्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. दोन तासानंतर हा हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलीसांनी तक्रार दाखल करून 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले. पण आरोपींना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक केली नाहीतर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू याठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नवनीत राणा यांना धमक्या
नवनीत राणा यापूर्वी अनेक धमक्या मिळाल्या आहेत. 10 ऑक्टोबरला नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले होते. यामध्ये 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान, दर्यापूर येथील राड्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. घटनास्थळावरील व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दर्यापूरमध्ये सुरक्षा वाढवली आहे.
आणखी वाचा
भाषण संपताच स्टेज खचला; उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, ठाण्यात नेमकं काय घडलं?, Video