Tomato prices : जून महिन्यात 100 रुपयांवर गेलेला टोमॅटो आता 40 रुपयांवर, महिनाभरातच दरात मोठी घट
जून महिन्यात प्रतिकिलो टोमॅटोसाठी 100 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता टोमॅटोच्या दरात 60 टक्क्यांची घट झाली आहे.
Tomato prices : एक महिन्याच्या आतच टोमॅटोच्या (Tomato )दरात मोठी घट झाली आहे. जून महिन्यात प्रतिकिलो टोमॅटोसाठी 100 रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता टोमॅटोच्या दरात 60 टक्क्यांची घट झाली आहे. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 40 रुपये द्यावे लागत आहेत. जून महिन्यात टोमॅटोच्या दरात तब्बल 158.78 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, जुलैमध्ये सातत्याने टोमॅटोचे दर कमी होत आहेत.
एकीकडे टोमॅटोच्या दरात जरी घट होती असली तरी बटाट्याच्या किंमती मात्र स्थिर आहेत. जुलैमध्ये चांगल्या प्रतीच्या बटाट्याच्या किंमतीत 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतात बटाट्याला चांगलीच मागणी वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये बटाटा आणि टोमॅटोची महागाई अनुक्रमे 23.86 टक्के आणि 158.78 टक्क्यांनी वाढली होती. टोमॅटोच्या किंमतीत लक्षणीय घट झाल्यामुळं जुलैमध्ये भाववाढ थंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशभरातील टोमॅटो पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम झाला होता, मात्र, सध्या पाऊस असल्यानं उष्णतेचा फटका बसणार नाही. पाऊस पडत असताना दुसरीकडे उत्पादनातही वाढ झाली आहे. कर्नाटकातील कोलार, बागेपल्ली, चिंतामणी या जिल्ह्यांमधून चांगलीच टोमॅटोची आवक सुरु आहे. तसेच आंध्र प्रदेशातील मदनेपल्ले यासारख्या ठिकाणाहून देखील टोमॅटोचा चांगला पुरवठा होत आहे. यामुळं जुलैमध्ये किंमती कमी झाल्या आहे. बाजारात आवक वाढल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे.
हवामानातील बदलामुळे मे आणि जूनमध्ये टोमॅटो पिकावर किटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. पुरवठा देखील कमालीचा घटला होता. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी दिली. दरम्यान, यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या होत्या. त्यामुळं मे आणि जूनमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ होत होती. जून, जुलै हे टोमॅटोसाठी चांगल्या भावाची शक्यता असलेले महिने असतात. मार्च 2022 मध्ये देखील टोमॅटोच्या कमी लागवडी झाल्या आहेत. त्यातच टुटा CMV ची दहशत होती. एप्रिल पर्यंत टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण खूप कमी राहिले. मे महिन्यात जसे दर वाढले, तसे सर्वांची लागवडीसाठी धडपड सुरु झाली होती.
महत्वाच्या बातम्या: