Rice Export : बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर सरकारनं बंदी का घातली? त्याचा नेमका परिणाम काय? वाचा सविस्तर...
केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तांदळाच्या बाजारपेठेवर नेमका काय परिणाम होणार याबाबतची सविस्तर माहिती.
Ban Rice Export : केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Ban Rice Export) घातली आहे. तांदळाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. निर्यातीवर बंदी घातल्याचा परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तांदळाच्या बाजारपेठेवर होणार आहे. मात्र, सरकारनं तांदूळ निर्यातबंदीचा निर्णय का घेतला? याचा नेमका काय परिणाम होणार याबाबत एबीपी माझाने ऑल इंडिया राइस एक्सपोर्ट असोसिएशनचे सीनियर एक्झिकेटिव्ह डायरेक्टर विनोद कौल (Vinod Kaul)यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे कारण काय?
काही भागात अतिवृष्टीमुळं खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळामुळं देखील देखील तांदूळ पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळं देशांतर्गत बाजारात तांदूळ उ्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशात तांदळाचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकारनं बगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ऑल इंडिया राइस एक्सपोर्ट असोसिएशनचे सीनियर एक्झिकेटिव्ह डायरेक्टर विनोद कौल यांनी दिली आहे. तसेच गेल्या वर्षभरात तांदळाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षभरात तांदळाच्या किमतीत 12 ते 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या किंमती नियंत्रीत करण्यासाठी सरकारनं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे कौल यांनी सांगितले.
बंदी घातल्यामुळं काय परिणाम होणार
दरम्यान, केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यावर बंदी घातल्यामुळं काही प्रमाणात तांदळ्याच्या किंमती कमी झाल्या होत्या. मात्र, पुन्हा तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता कौल यांनी व्यक्त केली आहे. भारताने 20 जुलैला निर्यातबंदी केल्यानंतर काही दिवसांमध्येच तांदळाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति टन 50 ते 100 डॉलरने वाढले आहेत. देशातील तांदळाचे वाढते भाव लक्षात घेऊन सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालेल, अशी भीती निर्यातदांना होती. पण, सरकार इतक्या लवकर निर्यातीवर बंदी घालेल, याचा अंदाज निर्यातदारांना नव्हता. दरम्यान, जर नैसर्गिक संकटाचा भात शेतीला फटका बसला नाही तर सरकार पुन्हा निर्यातीला परवानगी देऊ शकते असे कौल यांनी सांगितले.
तांदूळ निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचा शेतकऱ्यांना देखील फटका बसणार असल्याची माहिती विनोद कौल यांनी दिली. देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमंती कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या तांदळाला मिळणार दर कमी होणार आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांनाचं बसणार आहे. निर्यातबंदी केल्यामुळं मागील वर्षीपेक्षा तील लाख टन तांदळाची निर्यात कमी झाली आहे. या फटका व्यापाऱ्यांना बसल्याचे कौल म्हणाले. आम्हाला आशा आहे की सरकार या निर्णयाचा पुनर्रविचार करेल असे कौल म्हणाले. मागील दोन वर्षात देशात 130 मिलीयन टन उत्पादन झाले आहे. यामध्ये आठ टनाच्या आसपासचे उत्पादन हे बासमती तांदळाचे असते बाकी सगळा तांदूळ हा गैरबासमती असल्याची माहिती कौल यांनी दिली. सरकारनं अचानक बंदी घातल्यामुळे निर्यातदारांवर करार रद्द करण्याची वेळ आली आहे. सरकारने निर्यातबंदी लागू केल्यानंतर करार केलेल्या तांदळाचीही निर्यात होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
एन-निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता, त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
देशातील पंजाब, हरियाणा, छत्तीसगडसारख्या राज्यात सध्या भात लागवड सुरु झाली आहे. पण, उशिराने होत असलेली भात लागवड अपेक्षित उत्पन्न देईल का, या विषयी जाणकार साशंक आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. जगभरातील संस्थांनी यंदा एल-निनो सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, एल-निनो सक्रियही झाला आहे. त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यावर दिसून येण्याची शक्यता आहे. एन-निनोमुळे पाऊस कमी होऊन देशातील कृषी उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राने यापूर्वीच तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातलेली आहे.