Tomato Rate : दिल्लीत टोमॅटोच्या दरात मोठी वाढ, प्रतिकिलोला 140 रुपयांचा दर
Tomato Rate : टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato price) झाल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत.
Tomato Rate : सध्या देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ (Tomato price) झाल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. आशियातील सर्वात मोठी फळे आणि भाजीपाला बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडईत टोमॅटोचे घाऊक दर हे 60 ते 120 रुपये प्रतिकिलो असून गुणवत्तेनुसार सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या टोमॅटोच्या किंमतीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
देशातील बहुंताश राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा टोमॅटोच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या पावसामुळं टोमॅटो पिकांचं नुकसान देखील झालं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळं बाजारात टोमॅटोचा तुटवडा देखील भासत आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रात 100 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती. तर बिगबास्केटवर टोमॅटोचे दर हे 105 ते 110 रुपये किलोवर आहेत. टोमॅटोचे दर केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर भागातही गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ ही हवामानातील झालेल्या बदलामुळं झाल्याचे सरकारनं म्हटलं आहे.
हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून टोमॅटोचा पुरवठा कमी
पावसामुळे प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यातून पुरवठा खंडित झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले असल्याची माहिती आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिली. कौशिक हे कृषी उत्पन्न विपणन समिती (APMC) आझादपूरचे सदस्य देखील आहेत. पावसामुळे हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे. आता दिल्ली-एनसीआर क्षेत्रासाठी हिमाचल प्रदेश हा एकमेव पुरवठादार असल्याची माहिती अशोक कौशिक यांनी दिली. सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत असल्याने काढणी आणि वाहतुकीवरही परिणाम होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील टोमॅटो उत्पादक केंद्रांतून व्यापाऱ्यांना टोमॅटोचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळं पावसाने दडी मारल्याने भाव चढे आहेत.
पुरवठा वाढल्यावर टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता
सध्या 25 किलोच्या क्रेटची किंमत 2400 ते 3000 रुपये आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची स्थिती सुधारल्यानंतर पुढील 15 दिवसांत दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टोमॅटोचे भाव चढेच राहतील. पुरवठा वाढल्यावर टोमॅटोच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे मत आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातही टोमॅटो दरात वाढ
मागील महिन्यात टोमॅटोचे दर हे 10 रुपये किलोवर पोहोचले होते. त्यानंतर आता देशातील टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही टोमॅटोचे दर वाढले आहेत. काही भागात हे दर 140 रुपये प्रति किलोवर गेले आहेत. टोमॅटोनं पेट्रोलचे दर मागे टाकल्याची प्रतिक्रिया ग्राहक देत आहेत. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विदर्भातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटो मे महिन्यापासून बाजार येणं बंद झाले आहेत. परिणामी ग्राहकांची मागणी बघता विदर्भात दक्षिणेतून टोमॅटो आयात केली जात आहेत. मात्र, मागणीनुसार टोमॅटोचा अगदी कमी पुरवठा होत असल्यानं टोमॅटोचे दर वाढल्याचं सांगितलं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: