Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, भंडाऱ्यात किलोला मिळतोय 140 रुपयांचा दर; पेट्रोलच्या दराला टाकलं मागं
Tomato Price : भंडाऱ्यात (bhandara) पेट्रोलच्या (Petrol) दराला टोमॅटोच्या दरानं मागं टाकलं आहे. भंडाऱ्यात टोमॅटोचे दर 140 रुपये किलोवर पोहोचलेत.
Tomato Price : देशभरात टोमॅटोच्या (Tomato) दरात मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. तर दुसरीकडे वाढत्या टोमॅटोच्या किंमतीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. भंडाऱ्यात (bhandara) पेट्रोलच्या (Petrol) दराला टोमॅटोच्या दरानं मागं टाकलं आहे. भंडाऱ्यात टोमॅटोचे दर 140 रुपये किलोवर पोहोचलेत.
टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यानं मागणीत वाढ
दक्षिणेतून येणाऱ्या टोमॅटोनं बाजारातील सर्व विक्रम मोडले आहेत. आज भंडाऱ्यात टोमॅटोचा दर 140 रुपये किलोवर पोहोचला आहे. पेट्रोलचा दर प्रती लिटर 107 रुपये असून टोमॅटोनं पेट्रोलच्या दराला मागे टाकलं आहे. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विदर्भातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटो मे महिन्यापासून बाजार येणं बंद झाले आहेत. परिणामी ग्राहकांची मागणी बघता विदर्भात दक्षिणेतून टोमॅटो आयात केली जात आहेत. मात्र, मागणीनुसार टोमॅटोचा अगदी कमी पुरवठा होत असल्यानं टोमॅटोचे दर वाढल्याचं सांगितलं जातं आहे.
मागील महिन्यात टोमॅटोचे दर हे 10 रुपयांवर होते
मागील महिन्यात टोमॅटोचे दर हे 10 रुपये किलोवर पोहोचले होते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. त्यानंतर मागील आठवड्यात टोमॅटोचा हाच दर 90 रुपये किलोपर्यंत गेला होता. आज भंडाऱ्यात भाजी वेक्रेते 140 रुपये प्रति किलो दरानं टोमॅटो विक्री करत असल्याचं बघायला मिळालं. टोमॅटोनं पेट्रोलचे दर मोडल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमध्ये उमटू लागली आहे.
पूर्व विदर्भात मे महिन्यानंतर भाजीपाला बाजारात येणं बंद होतं
विदर्भातील विशेषतः पूर्व विदर्भातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजीपाल्यांची शेती करतात. उन्हाळ्यात रब्बी पिकांसह भाजीपाल्याची शेती केल्यानंतर खरीप हंगामात भाजीपाल्यांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यामुळं पूर्व विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो किंवा अन्य पालेभाज्या लावल्या त्यांचा भाजीपाला मे महिन्यानंतर बाजारात येणं बंद होते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, पालेभाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दक्षिणेकडील राज्यातून टोमॅटोची आयात
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडे टोमॅटो बाजारात येणं बंद झाले आहे. या भागातील गृहिणी आणि ग्राहकांना लागणाऱ्या टोमॅटोचा पुरवठा करता यावा यासाठी आता दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून भंडाऱ्यासह पूर्व विदर्भात टोमॅटोची आयात होत आहे. एकट्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज 10 हजार कॅरेट टोमॅटोची गरज आहे. मात्र, पाकिस्तानातील निर्यात वाढल्यानं भंडारा जिल्ह्याला केवळ तीन हजार कॅरेट्स पुरवठा होत आहे. पाकिस्तानात टोमॅटो जात असल्यानं आणि पूर्व विदर्भातील मागणी बघता टोमॅटोचे दर प्रति कॅरेट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत
महत्त्वाच्या बातम्या: