(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करुन द्या, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा : कृषीमंत्री
शेतकऱ्यांना वेळ बी बियाणे उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिले आहेत.
Agriculture News : यावर्षी खरिपाच्या (Kharip season) क्षेत्रात 1 लाख 10 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बियाण्यांचं आणि खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिली. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करुन राज्य शासनाने 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. शेतकऱ्यांना वेळ बी बियाणे उपलब्ध करुन द्यावेत असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
सरकारनं 13 लाख क्विंटल वितरीत केले आहेत. आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे. तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईल, असे नियोजन केले जात असल्याची माहिती,धनंजय मुंडे यांनी दिली. खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बियाणे उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, बी-बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गोंदवले, महाबीजचे श्री.कलंत्री, कृषी विद्यापीठांचे बियाणे विभाग प्रमुख, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावीत
सध्या राज्य शासनाने खते व कृषी निविष्ठा यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी कायदे प्रस्तावित केले आहे. हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित आहेत. सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले. बी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी शासनाचा व्हाट्सॲप क्रमांक 24 तासात सक्रीय करून शेतकऱ्यांना कळविण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.
बोगस बियाणे विक्री आढळल्यास कारवाई करा
दरम्यान, राज्यात विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांची मागणी केली जाणे, साठेबाजी याबाबतच्या उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस-सोयाबीन योजना व अन्य योजनांच्या तसेच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहेत. कुठेही त्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
कृषीमंत्र्यांना हिरवी आणि लाल मिर्चीतला फरक कळतो का? यशोमती ठाकूरांचा धनंजय मुंडेंना टोला