Manikrao Kokate and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रिपद धोक्यात, तटकरे म्हणाले, 'त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!'
Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करताना दिसून आले आहेत. आता त्यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर अजितदादा कारवाई करणार?

Manikrao Kokate Playing Rummy: शेतकऱ्यांविषयी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्य आणि नुकत्याच झालेल्या अधिवेशनावेळी सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ते सोमवारी धाराशिव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शेतकरी संकटात असताना कृषीमंत्रिपदासारखं महत्त्वाचं आणि संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्याने योग्यप्रकारे शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. त्यांच्याकडून घडलं ते अयोग्य होते. पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. काहीवेळेला माणिकराव कोकाटे यांची शेतकऱ्यांसंदभात जी, वक्तव्य आली ती चुकीची होती. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना निश्चित समज दिली असेल. त्यांनी पीकविमा आणि कर्जमाफी संदर्भात जेव्हा वादग्रस्त वक्तव्ये केली होती, तेव्हाही त्यांना अजित पवारांनी समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओवर जो खुलासा केला तो चुकीचाच होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे वागणे योग्य नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवारांच्या अत्यंत मर्जीतील नेते असणाऱ्या सुनील तटकरे यांची ही वक्तव्यं पाहता आता माणिकराव कोकाटे यांचं कृषीमंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात एखादा कटू निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी काल लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीबद्दल नाराज व्यक्त केली. सूरज चव्हाण यांना आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावून घेतले आहे. मी आजचा दौरा संपवून दिल्लीला जात आहे. तो दौरा संपवून राज्यात आल्यानंतर त्यासंदर्भातही निर्णय होईल. तुम्ही एक संघटना (छावा) म्हणून शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत आहात. राज्यकर्ते म्हणून आम्ही या भावना शांतपणे ऐकून घेतल्या पाहिजेत, ते आमचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यातून आम्ही सौहार्दाने वागणे गरजेचे आहे. तुम्ही सांगितलेल्या दोन्ही मागण्यांचा आम्ही गांभीर्याने विचार करु, असे आश्वासन सुनील तटकरे यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंनी नेमकं काय केलं?
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला होता. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते की, 'वरच्या सभागृहात कामकाज तहुकुब झाल्याने मी तिथे बसलो होतो. खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला. मोबाईल ओपन करून युट्युबवर जात असताना अनेक प्रकारच्या जाहिराती समोर येतात. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला आहे. त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलाच नाही. ते कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे. कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे. कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कुठलाही विरोधी पक्ष नेता बोलत नाही. माझं काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. तेथे कॅमेरे चालू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा























