शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत Sunil Gavaskar आणि Dilip Vengsarkar यांचा गौरव
भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा २९ ऑक्टोबरला गौरव करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं गावस्कर यांना वानखेडे स्टेडियमवर कायमस्वरुपी कक्ष भेट देण्यात येणार आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडचंही उद्घाटन करण्यात येणार आहे. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. एमसीए कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टी२० मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीला उपस्थित होते. मुंबईनं भारतीय क्रिकेटला दिलेल्या दोन महान फलंदाजांच्या गौरवासासाठी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना एकत्र बोलावता येऊ शकतं या नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमतानं अनुमोदन मिळाल्याचं कळतं. योगायोगाची बाब म्हणजे पवार आणि मुख्यमंत्र्यांचं मुंबई क्रिकेट आणि एमसीएशी जिव्हाळ्याचं नातं आहे.