Journalist Reaction On Raigad Loksabha : अनंत गीते की सुनील तटकरे? बाजी कोण मारणार?
रायगड: राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार, हा आता नाक्यावर आणि हॉटेल्स मध्ये प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर मशाल चिन्ह घेऊन यंदाच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उद्धव गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे (Raigad Lok Sabha) अनंत गीते (Anant Gite) हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारात सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती हे त्यांच्या सभांमधील गर्दी मधून स्पष्ट होत होती.
शिवसेनेच्या जन्मापासून बालेकिल्ला राहिलेल्या कोकणातील जनतेमध्ये धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिल्याचा राग जनतेच्या मनात असल्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात उद्धव यांच्यासाठी सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली होती,याचा मोठा फायदा अनंत गीते यांना होईल अशी राजकीय विश्लेषकांमध्येही चर्चा आहे.सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोरबा भागत घेतलेली सभा अनंत गीते यांना पोषक ठरेल,त्यात उद्धव यांच्याबरोबर आता जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम मतदार या यावेळीच्या निवडणुकीमध्ये निर्णायक टप्पा ठरणारा आहे.
तर दुसरीकडे अजित पवार गटातून महायुतीचे म्हणून उमेदवार असलेले सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपल्या संपूर्ण राजकीय प्रवसाचा अनुभव पणाला लावून जोरदार खिंड लढवल्याचे पाहायला मिळत आहे. इथेही शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बंडाचा सुनील तटकरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सुनील तटकरे व्यक्ती म्हणून उत्तम, पण त्यांना दिलेले मत मोदींना जाणार या भावनेतून मुस्लिम समाजाचे सुनील तटकरे यांना स्पष्टपणे नकार दिल्याचे अनेक प्रसंग मंडणगड, खेड, गुहागर या सारख्या बहुसंख्य मुस्लिम वस्त्या असलेल्या भागात घडल्याचे ऐकिवात आहे. श्रीवर्धन ,अलिबाग, म्हसळा, महाड, या भागात तटकरे विरुद्ध गीते असा चांगला सामना रंगताना दिसेल, पुढे दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रतिष्ठेची निवडणुकी करून कंबर कसत काम केलं आहे, पण असे असले तरीही मताधिक्य किती होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या भागातील स्थानिक राजकारण हे प्रचंड वेगळ्या पद्धतीने रांगल्याचे दिसले होते.