Harshvardhan Patil : घेतली तुतारी, मिळाली उमेदवारी; मिटकरी म्हणाले, गद्दारीकडे भाजपचं दुर्लक्ष
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना मदत केल्याचा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय. आज हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेतील. कुटुंबासह त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता सुप्रिया सुळेंना मदत केल्याची परतफेड म्हणा किंवा आणखी काही, हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी लागलीच इंदापूरची उमेदवारी जाहीर केली. हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा, त्यांना कोणती जबाबदारी द्यायचं हे माझं काम असं सूचक वक्तव्य देखील शरद पवारांनी केलंय.
इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) जाहीर प्रवेश केला. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayan Patil) यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, इंदापूरचा निकाल काय लागेल? हे आताच जाहीर झालं आहे. 2019 साली आमचे नेते सोडून जात होते.अ,ब,क,ड गेला तरी चालेल कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. दिल्ली पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न करते. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल, असे दिल्लीला वाटते. हर्षवर्धन पाटील तुम्ही स्वग्रही येत आहे. आधी आमच्याकडे गर्दी जास्त होती. ती आता कमी झाली. त्यामुळे आता येत आहात त्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.