Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Chandrapur News : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या वृषाली पांढरे नगरसेवकपदी एका मतानं विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाची जोरदार सुरु आहे.

Chandrapur Bhadravati चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांची निवडणूक पार पडली. या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं 7, भाजपनं 2, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं एका ठिकाणी आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाला. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला मिळवून दिलेलं यश आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली परखड मतं यामुळं चंद्रपूरच्या निकालाची चांगलीच चर्चा होते आहे. जिल्ह्यात काँग्रेसनं एकहाती सत्ता आणली अन् विजय वडेट्टीवार यांनी गुलाल उधळला. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसची तगडी फळी समोर असताना केवळ एका मताने भाजपच्या वृषाली पांढरे विजयी झाल्या. भद्रावती नगरपालिकेत भाजपकडून एका मतानं विजयी झालेल्या महिला नगरसेवकाची चर्चा होतेय. सोबतच त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवा पांढरे यांच्या जोडीचीही चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर होताना दिसत आहे.
भद्रावती नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 12 च्या उमेदवार वृषाली पांढरे या केवळ एका मताने विजयी झाल्या आहेत. एकीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सोबतच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती. कारण,अनिल धानोरकर हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला आपला उमेदवार निवडून आणणं मोठं आव्हान होतं. त्यामुळे भाजपने यंदा भरपूर प्रयत्न केले. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार करण देवतळे, रविंद्र शिंदे यांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. काँग्रेस आणि भाजप या दोघांवर मात करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी झाले.या सगळ्या परिस्थिती भद्रावती नगरपालिकेत वृषाली पांढरे आणि गिता सावनकर या दोन उमेदवारांनी भाजपची शान राखली.
मावशी भाच्याने ठरवलं अन् गुलाल उधळला…
काहीही झाल तरी यंदा आपण मावशी वृषाली पांढरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असं भाच्याने अन् पुतण्याने ठरवलं होत. त्यानुसार अनेकांचा विरोध पत्कारुन जागा मिळवली. गावात काँग्रेसची तगडी फळी असताना पुतण्या आणि भाचा असलेल्या शिवा पांढरे याने यंत्रणा कामाला लावली मित्र मंडळी आणि सगळ्यांना एकत्र केलं आणि मावशीला रिंगणात उतरवलं. काँग्रेसच्या समोर टिकणे कठीण असताना जागा निवडून आणायचीच अस ठरवलं अन् अखेर सगळ्या काँग्रेसच्या फळी पुढे मावशी भाच्याची जोडी अव्वल ठरली.
कुटुंबांची साथ महत्वाची ठरली...
या यशाचं श्रेय वृषाली पांढरे यांनी त्यांचा पुतण्या आणि भाचा असलेल्या शिवा पांढरे आणि त्याच्या मित्रांना दिलं. सोबतच आपल्या कुटुंबीयांना दिलं. भद्रावतीतील सगळ्या महिला मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना दिलं आहे. वृषाली पांढरे यांना यांचे पती विनोद पांढरे यांचा भक्कम पाठिंबा आहे. त्याच पाठींब्यामुळे आज त्यांनी विजय खेचून आणला आहे.





















