Raj - Uddhav Thackeray : दोन्ही ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र,राजकीय युतीही लवकरच? पुढे काय होणार?
Raj - Uddhav Thackeray : दोन्ही ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र,राजकीय युतीही लवकरच? पुढे काय होणार?
मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर आज तब्बल 19 वर्षानंतर मुंबईत (Mumbai) ठाकरे बंधू एकत्र आले. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. तर, राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषण करुन राजकीय फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरही बोचरी टीका केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या भाषणानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा देत मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावर बोलावलं. मात्र, तरीही ज्यांची नाव घ्यायचं राहिलं, त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत फेसबुक पोस्ट केली आहे.
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून थेट इशाराच दिला होता. कोण नाही येत मी बघतोच, असे म्हणत कोण कोण मोर्चाला येत आहे तेही मी लक्षात ठेवेन असं म्हटलं होतं. त्यानुसार, आजच्या विजयी जल्लोष मेळाव्यात मराठी सेलिब्रिटी अन् कलाकारांची गर्दी पाहायला मिळाली. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, चिन्मयी सुमित हे कलाकार पाहायला मिळाले. यांच्यासह अनेकही कलाकार मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि आमदार, खासदारही या सोहळ्यात उपस्थित राहिले. राज ठाकरेंनी उपस्थित नेत्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे आभार मानले. त्यामध्ये, रासपचे महादेव जानकर, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कम्युनिष्ट पक्षाचे जयंत पाटील, प्रकाश रेड्डी यांसह विविध नेते व्यासपीठावर होते. राज ठाकरेंनी या सर्वांचे आभार मानले. मात्र, उपस्थित कलाकार आणि माध्यमांचे विशेष आभार मानत दिलगिरी व्यक्त केली आहे.
''हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं, त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार,'' अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर केली आहे.




















