Manoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा
परभणी : आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा शेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीयवादी कसे काय? असा सवालही जरांगे यांनी विचारला. संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, "धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."