Nashik Pimpalgaon Baswant Honey Bee Park : नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये देशातलं पहिलं हनी बी पार्क
Nashik Pimpalgaon Baswant Hone Bee Park : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मधमाशीवर आधारित पर्यटन म्हणजेच ‘अॅपि-टुरिझम’चे देशातील नाविन्यपूर्ण व पहिलेच केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याला पर्यटकांचाही दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतोय. तिन वर्षांपूर्वी हे केंद्र सुरु करण्यात आले असून ईथे पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’परिसंवाद, हनिबी फेस्टिवल, प्राचार्य- मुख्याध्यापक परिषद, फळाफुलांचे प्रदर्शन व स्पर्धा तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात. मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता या पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिले जाते, या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. बसवंत कृषी उद्योजक पर्यटन केंद्रामध्ये मधमाशी पालन, फळे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, आदर्श ग्राम- सेवरगांव, ग्रामसंस्कृती केंद्र या प्रकल्पांबरोबरच करमणुकीसाठी गेम झोन सुरू करण्यात आलाय. या सर्व प्रकल्पांचे मुख्य आकर्षण असलेल्या मधमाशी उद्यानात मधमाशीबद्दल प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बसवंत हनी बी पार्कला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉनसीबल टुरिझम या संस्थेचा सन्मानजनक असा “रिस्पॉनसीबल टुरिझम’’अॅर्वार्ड मिळाला आहे. नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता संवर्धन करण्यासाठी पर्यटनाचे योगदान या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. यापुढील काळात बसवंत गार्डन आणि एपिटुरिझम सेंटर च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मधमाशी आणि ग्रामीण पर्यटन ही संकल्पना राबवून समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणार असल्याची भावना ग्रीनझोन ऍग्रोकेम चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी व्यक्त केलीय.