(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : नाशिक मनपाच्या कंत्राटी डॉ. सुवर्णा वाजेंच्या हत्येचं गुढं उलगडलं, नवराच निघाला आरोपी
नाशिक : नाशिक महापालिकेच्या कंत्राटी डॉक्टर सुवर्णा वाजे यांची हत्या त्यांच्याच पतीनं केल्याचं उघड झाले आहे. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून संदीप वाजे यांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 25 जानेवारीला नाशिक शहरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर स्वत:च्याच कारमध्ये सुवर्णा वाजे यांचा मृतदेह सापडला होता. त्याच्या आधीच पत्नी गायब झाल्याची तक्रार संदीप वाजेनं पोलिसात केली होती.
सुवर्णा वाजे असे मृत महिलेचे नाव आहे. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. रात्रीपर्यंत त्या कामावरून घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांना 25 जानेवारीला रात्रीच्या सुमारास वाडीवऱ्हे गावाजवळ एक कार जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. या कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
सुवर्णा वाजे या 25 जानेवारीला दुपारी 4.30 वाजता घरातून महापालिका रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री 9 वाजून गेल्यानंतरदेखील पत्नी घरी न आल्याने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीने तिला मेसेज केला. त्यावेळी पत्नीच्या मोबाइलमधून 'मी कामात आहे, वेळ लागेल,' असा रिप्लाय दिला मात्र त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला. त्यानंतर पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे गावाजवळ जळालेल्या कारमध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.