Uddhav Thackeray On Hindi : हिंदीसक्तीचा निर्णय का लादला? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray On Hindi : हिंदीसक्तीचा निर्णय का लादला? उद्धव ठाकरेंचा सवाल
मुंबई : हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचं दिसून येतंय. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं. तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले.
राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थाची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर शासनाच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Uddhav Thackeray Protest Against Hindi : दादर परिसरात बॅनरबाजी
दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. 'हिंदीसक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे.
संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता तो शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. यात केवळ शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू."






















