Uddhav Thackeray on Dharavi : जगातला हा सर्वात मोठा टीडीआर घोटाळा : उद्धव ठाकरे
मुंबई: धारावीच्या विकासाला आमचा आजिबात विरोध नाही, पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, बाकी काही कारणं चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला. धारावीकरांना जिथल्या तिथे घर द्या, व्यवसायाला जागा द्या, धारावीतील कोळीवाडा आणि कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधात मोर्चा (Shivsena Dharavi Morcha) काढण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. गरज पडली तर मुंबईच काय तर आख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. ज्यांनी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी समजून घ्यावं हा अडकित्ता आहे, त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा त्यांनी भाजपला दिला. जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत आणा, सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.