Mumbra Road : मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम 1 एप्रिलपासून सुरू होणार
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच साकेत आणि खारेगाव खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या काळात ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणांनी व्यवस्थित नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. शिनगारे यांनी बुधवारी याबाबत तब्बल अडीच तास बैठक घेतली. ज्या मार्गांवरून वाहतूक वळवण्यात येणार आहे, ते मार्ग चांगल्या स्थितीत असतील याची दक्षता घ्या, असे निर्देशही शिनगारे यांनी दिले. साकेत उड्डाणपूल व खारेगाव खाडीपुलाचे काम 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या दोनही मार्गावरील दुरुस्ती काळात वाहतूक नियोजनासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे देण्यात येणार आहे.























