Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर भावाचं 'रक्षण',भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीची कहाणी
Raksha Bandhan Special : आज रक्षाबंधन...भावाबहिणीच्या अतूट नात्याचा दिवस. आज आम्ही तुम्हला अश्याच एका भावाबहिणाला भेटवणार आहोत. ज्यांच्यासाठी आजचा रक्षाबंधन खूप विशेष आहे. कारण एका बहिणीने आपल्या भावाच्या पोस्ट कोविड उपचारादरम्यान दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. अशा भावाला आपली किडनी दान देऊन त्याला जीवनदान दिलं आहे.
शरद गावकर ज्यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमध्ये समाजसेवेचे कार्य सुरू केले आणि त्याच दरम्यान त्यांना आणि पत्नीला कोविडची बाधा झाली. कोविड ट्रीटमेंट घेत असतानाच त्यांची तब्येत सिरीयस झाली आणि त्यांना आपल्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. जोपर्यंत किडनी ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत आपल्याला डायलिसिस राहावे लागणार हे त्यांना कळल्यावर त्यांची पायाखालची जमीन घसरली.
मात्र, आपल्या भावाची डायलिसिस वरची परिस्थिती बहिण प्रमिला कांबळी यांना बघवत नव्हती. भावाला होणारा त्रास कसाही करून कमी व्हावा यासाठीच तिने आपल्या भावाचा जीव वाचविण्यासाठी स्वतः किडनी द्यायचं ठरवलं आणि 'भावासाठी काहीपण' म्हणत आपली किडनी दान करायचं ठरवलं.
प्रमिला यांच्या पतीचा सुद्धा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाला आहे. त्यामुळे पतीला गमावलेल्या प्रमिला यांना कसंही करून भावाला वाचवायचं होतं. त्यामुळे कुठला विचार न करता आपल्या भावाला एक नवं आयुष्य या बहीणीने भावाला दिलं. खरंतर रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, मात्र आज या बहिणीनेच आपल्या भावाला नवं आयुष्य देऊन आयुष्यभराची ओवाळणी दिली.
आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भाऊरायला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारी ही बहीण आणि तेवढाच जीवापाड प्रेम करणारा हा भाऊ. भावाबहिणीचं अतूट नातं जे आयुष्यभर राखीच्या धाग्याप्रमाणे घट्ट कायमच बांधलेला गेलंय. याचा खरा अर्थ आज रक्षाबंधनाच्या दिवशी समाजाला सांगणारी ही कहाणी..