Prashant Damle : नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार - प्रशांत दामले
Prashant Damle : नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार - प्रशांत दामले 100 वर्षे जुने ऐतिहासिक दामोदर नाटय़गृह पुनर्बांधणीच्या नावाखाली जमीनदोस्त करण्याचा घाट आहे. याविरोधात कलाकार मंडळी सरसावली आहेत. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दामोदर नाटय़गृह वाचवण्यासाठी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाचा इशारा दिला. सोशल सर्विस लीगचे दामोदर नाटय़गृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद आहे. नाटय़गृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा जाण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाटय़कर्मींमध्ये नाराजी आहे. नाटय़गृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे, अशी दामोदर नाटय़गृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाची मागणी आहे. अधिवेशनात नाटय़गृहाच्या तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सोशल सर्विस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले आहे. याबद्दल नाटय़ परिषदेने आज तीव्र निषेध केला. ‘हा विषय सामोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झाले आहे. याविरोधात सोशल सर्विस लीगला पत्र लिहिले जाणार आहे. जर त्यांनी ऐकले नाही तर नाटय़गृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार,’ असे प्रशांत दामले म्हणाले.