(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mucormycosis : म्युकरमायकोसिस कोरोनापेक्षा घातक ठरु शकतो : हायकोर्ट
बई : राज्यातील म्युकरमायकोसिसच्या परिस्थितीसह कोरोनासंबंधित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा सुरु आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरु आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? म्युकरमायकोसिससाठी कोणतं औषधं उपयोगी आहे? राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची परिस्थिती काय आहे? असे सवाल हायकोर्टाने विचारले. त्यावर राज्य सरकारसह केंद्र सरकार आपली बाजू मांडत आहे. यासंदर्भात काय काय उपाययोजना केल्या याची यादी राज्य सरकारने वाचून दाखवली. तर म्युकरमायकोसिसवरील औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच कंपन्यांना परवानगी दिली असून उत्पादकांची संख्या आता 7 वरुन 12 झाली आहे, असं केंद्र सरकारने सांगितलं.
"काळ्या बुरशीचा आजार हा कोरोनापेक्षा भयंकर आहे. यावर जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण कायमची दृष्टी गमावू शकतो. पण प्रशासनाकडे यावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही," असा दावा याचिकाकर्त्यांची हायकोर्टात दिली. त्यावर काळ्या बुरशीसाठी कोणतं औषधं उपयोगी आहे? अशी सवाल हायकोर्टाने विचारला. तसंच पुणे, सांगली, सातऱ्यानंतर आता काळ्या बुरशीचा आजार मुंबईतही पसरु लागला आहे, असं हायकोर्टाने म्हटलं.