(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi MIDC Fire | भिवंडी एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग
भिवंडी : भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरु झाले आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परीसरातील कपिल रेयॉन इंडिया प्रायवेट लिमिटेड या डाईंग कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
रात्री दोन ते अडीचच्या सुमारासा या कंपनीत आग लागली. त्यावेळी या कंपनीत असलेले 30 ते 40 कामगार वेळेत बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला. कंपनीच्या दोन मजली इमारतीमध्ये सगळीकडे आग पसरली आहे. या कंपनीत कच्च्या कपड्याचा आणि पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा तसेच धागा होता. तसेच दोन्ही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनी जळून खाक झाली आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान या ठिकाणी झाले आहे.
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे अडचण निर्माण होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत मागण्यात आली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत.