Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHA
मुंबई : देशभरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच, राज्याभर गावोगावी आणि घरोघरी गणपती (Ganpati) बाप्पांना वाजत-गाजत पण तितक्यात भावूक वातावरणात निरोप दिला जातोय. राजधानी मुंबईतील प्रसिद्ध लागबागचा राजा गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघाली असून हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेत लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईतील मरीन लाईनच्या समु्द्रकिनारी जनसागर उसळल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ठाणे, कल्याण आणि इतरही ठिकाणी गणपती बाप्पांच्या निरोप मिरवणुकांना गर्दी झाली आहे. अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या निमित्ताने परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरात चार ते पाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील (Bhiwandi) छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक लाख वडापाव भक्तांना वाटप करण्यात येणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परोपकार संस्थेच्या वतीने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वडापाव वाटपाची परंपरा पुढे नेण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही संस्था गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश भक्तांना वडापाव वाटपाची सेवा देत आहे. यावर्षी देखील या सेवेसाठी तब्बल एक महिन्यापासून तयारी करण्यात आली आहे. या सेवेसाठी 25 ते 30 कामगार सकाळपासून वडापाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होताच, या वडापावचे वितरण परोपकार संस्थेच्या स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. गणेश विसर्जनाचा दिवस असल्याने भिवंडीमध्ये भक्तगण मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरले आहेत. विविध मंडळांच्या मिरवणुका शहरातील प्रमुख चौकांतून पार पडत असून भक्तांचा उत्साहात सहभाग आहे. त्यामुळे, मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांना यंदा मोफत वडापाव खायला मिळत आहे.